केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. मुंबईचा दादा फक्त शिवसेना असल्याच्या राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत राणेंनी शिवसेना फक्त मातोश्रीपुरतीच दादा असल्याचा टोला लगावला. तसेच संजय राऊत यांचे धमक्यांचे दिवस संपले, आता तुमची जागा बाहेर नाही, तर ‘आत’ आहे, असं म्हणत सूचक इशारा दिला. नारायण राणे यांनी ट्वीटद्वारे हे मत व्यक्त केलं आहे.
नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “शिवसेना”, पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. संजय राऊत यांचे धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत.”
“तुमची जागा बाहेर नाही आता ‘आत’, तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा”
“तुमची जागा बाहेर नाही आता ‘आत’, तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा. तुमच्या धमक्यांना कोणी भीक घालत नाही आणि भाजपावाले तर नाहीच नाही,” असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं. राणेंनी आपल्या या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र भाजपाला टॅग केलंय.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले, “माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनला ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे.”
पत्रातून गौप्यस्फोट केल्यानंतर संजय राऊतांचं भाजपाला जाहीर आव्हान; “इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण…”
“कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं”
“कशाप्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधकांचा आवाज दाबवण्यात आला यासंबंधी नरेंद्र मोदींनी कालच राज्यसभेत सांगितलं. आता तर त्यांचं सरकार आणीबाणीपेक्षाही वाईट पद्धतीने राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सभापतींना याची माहिती देत पुढील लढाईला जावं यासाठी पत्र लिहिलं आहे. आम्हाला माहिती नाही असं त्यांना कोणी सांगू नये. कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“मला देशभरातून सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन आले आहेत. महाराष्ट्र, बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं, प्रमुख लोकांचा गळा दाबायचा, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, त्यांच्याविरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे हे सुरु आहे. पण आमच्यासारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.