काँग्रेस उमेदवार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीमधील संघर्ष शरद पवार यांच्या कानपिचक्यांनंतर अधिकच चिघळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवल्याच्या पवार यांच्या वक्तव्यामुळे या संघर्षांची धग अधिकच तीव्र झाली असून त्यामुळे संवेदनशील बनू लागलेल्या या मतदारसंघाला पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचा वेढा पडला आहे. दोन्ही जिल्ह्य़ांत पाच हजार पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे व  राखीव पोलीस दलाचे जवान आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील हॉटेले आणि लॉजवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. राणे यांच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना सशस्त्र पोलिसांचे विशेष संरक्षण पुरविण्यात आले असून मतदारसंघात तणावपूर्ण शांतता अनुभवास येत आहे.
या मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नसली तरी कोणताही धोका पत्करण्याची सुरक्षा यंत्रणांची तयारी नसल्याचे सुरक्षा व्यवस्थेवरून स्पष्ट दिसू लागले आहे. त्यातच, राणेपुत्राच्या नेतृत्वाखालील स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने कोकणात दाखल होऊ लागले असून त्यांची वर्दळ जाणवत नसली तरीही मतदारसंघात अस्वस्थता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गातील काँग्रेस-राष्ट्रवादीमधील या राडय़ाचे पडसाद राज्यात इतरत्र उमटू लागले आहेत. नाशिक मतदारसंघात सिन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या सभास्थानीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या क्षोभाला वाट करून दिली. भुजबळ यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खदखदत असलेल्या नाराजीला सिधुदुर्ग मतदारसंघातील घडामोडींचे निमित्त मिळाले असून राणे पितापुत्रांच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेची परतफेड करण्यासाठीच सिन्नरमध्ये काँग्रेसने संधी साधून राष्ट्रवादीविरोधी पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. सिन्नर येथे आयिोजित सभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत भुजबळ विरोधाला वाट करून दिल्याने, या सभेकडे पाठ फिरविण्याची पाळी भुजबळ यांच्यावर आली. एकत्र निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच या मतभेदांनी तोंड वरकाढल्याने, उभय पक्षांची पंचाईत झाली असून कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील रुंदावलेल्या दरीचेही प्रदर्शन झाल्याचे मानले जात आहे.

मतांसाठी मुंडे मनसेच्या दारात
मनसेला महायुतीत घेण्याचा आता प्रश्नच येत नाही, असे सांगून चार दिवसांपूर्वीच हात झटकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मतदारसंघात मदत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दार ठोठावले. बीडमध्ये मनसेने मला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणारा फोनच मुंडे यांनी राज यांना केला. त्यावर राज यांनीही मंगळवारी सायंकाळी मुंडेंना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

Story img Loader