केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या मुंबईत असून जन आशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून ते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. याच भेटींमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळाची भेट देखील बरीच चर्चेत होती. शिवसैनिकांनी नारायण राणेंना स्मारकाला भेट देऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, आज नारायण राणेंनी शांततापूर्ण वातावरणात स्मारक स्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी सावरकर स्मारकाला देखील भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा दिला.
“बाळासाहेबांनीच मला घडवलं”
यावेळी बोलताना नारायण राणेंनी बाळासाहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत. असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं”, असं राणे म्हणाले.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच या राज्याला…”, नारायण राणेंचा जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीलाच निशाणा!
“३२ वर्षांच्या पापाचा घडा फुटणार”
यावेळी नारायण राणेंनी अप्रत्यक्ष राजकीय टोला देखील लगावला. “एवढंच सांगेन, कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं. कुणाला वाटत असेल, तर स्वत: बोलावं, डाव्या-उजव्यांना बोलायला लावू नये. जशास तसं उत्तर देण्याबद्दल माझी ख्याती आहे. त्यामुळे कुणीही आपल्यामध्ये मांजरीसारखं आड येऊ नये. ही यात्रा यशस्वी होईल आणि येणारी महानगर पालिका भाजपा जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही”, असं राणे यावेळी म्हणाले.
कधीकाळी राणेंचा निवडणुकीत पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांनीच आज केलं राणेंचं स्वागत!
“आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाही”
गर्दी टाळण्यासाठी राजकीय कार्यक्रम करू नयेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. याविषयी विचारणा केली असता राणेंनी उद्धव ठाकरेंनाच टोला लगावला. “राजकीय आम्ही काहीही करत नाही. जनतेला भेटतोय. जनतेच्या आशीर्वादाने तेही बसले आहेत. ते तर आड मार्गाने बसले आहेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही करोनाची सगळी काळजी, सगळे नियम पाळू. आम्ही शपथ घेतली आहे, त्या शपथेचं पालन करू. आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाही. जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता फार कमी दिवस राहिले आहेत. वाट पाहा. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे”, असं राणे म्हणाले.