राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचे स्पष्ट संकेत दिल्याचं मानलं जात आहे. तर, या नियुक्तीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राष्ट्रवादीतील नव्या नियुक्ती आणि अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारला. यावर राणे यांनी म्हटलं की, “नवीन नियुक्त्या हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष असल्याने दोन पदे दिली. त्यात मी हस्तक्षेप करावा, असं वाटत नाही.”
हेही वाचा : काँग्रेसच्या चार पिढय़ांनी केले नाही ते काम मोदींनी केले!, अमित शहा यांची काँग्रेसवर टीका
“…मग प्रश्न राहतो कुठं”
“तसेच, अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं वाटत नाही. शरद पवारांना वाटेल, तसे पदे द्यावीत. कारण, त्यांना राजकारण जास्त कळतं. माझ्यापेक्षा शरद पवारांचा अनुभव जास्त आहे. त्यामुळे प्रश्न राहतो कुठं,” असं नारायण राणे यांनी सांगितलं.
“आम्ही सगळ्यांनी मिळून निवडीचा निर्णय घेतला”
नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर असल्याने आपण त्याबाबत समाधानी आहोत. आम्ही सगळ्यांनी मिळून निवडीचा निर्णय घेतला होता. त्याामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मीच सुप्रिया सुळे यांचं नाव सुचविले आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, त्यात…”, एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
“मला महाराष्ट्रातील राजकारणात अधिक रस”
“प्रफुल्ल पटेल आणि मी एकाच वर्षी खासदार झालो होतो. सुप्रिया सुळे अनेक वर्षे दिल्लीत आहे. मला महाराष्ट्रातील राजकारणात अधिक रस आहे. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. ती मी पार पाडतो आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.