कोकणातील पर्यावरणाबाबत कोणी काहीही म्हणत असले तरी तेथील विकासाच्या आड कोणाला येऊ देणार नाही. डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही, असा थेट इशारा देत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच रुद्रावतार धारण केला. प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरू, असेही सुनावणाऱ्या राणे यांच्या या अवतारामुळे सारे मंत्रिमंडळ काही काळ अक्षरश: स्तब्ध झाल्याचे समजते. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातील १९२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १९५ गावांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणून जाहीर केले आहे.     

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा मुंबईत धुडगूस
मुंबई : स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व नारायण राणे यांचे पुत्र नीतेश यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत धुडगूस घातला. आक्रमक कार्यकर्त्यांनी जुहू येथील गोवा भवनाच्या फलकाची नासधूस केली तर बोरिवली येथे नीता ट्रॅव्हल्सच्या बसेसवर दगडफेक केली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या दगडफेकीत बस गाडय़ांच्या काचा फुटल्या आणि सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एमएचबी पोलिसांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना  गुरुवापर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खिलजे यांनी दिली.

‘कृपया माझ्या मुलाला सोडून द्या’
पणजी : धारगळ टोलनाक्यावर केलेल्या मारहाणीप्रकरणी अटक झालेल्या नीतेश यांच्या सुटकेसाठी नारायण राणे यांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे विनंती करावी लागली. धारगळ येथील प्रकारानंतर राणे यांनी तातडीने गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांना दूरध्वनी करून नीतेश यांच्या सुटकेसाठी विनंती केली. नीतेशच्या प्रकरणात आपण लक्ष घालावे व शक्य असेल तर त्यास सोडून द्यावे अशी विनंती करणारा दूरध्वनी राणे यांनी आपल्याला केल्याची माहिती पर्रिकर यांनी बुधवारी पणजी येथे दिली.

‘नीतेशकडून नुकसानभरपाई वसूल करा’
मुंबई : गोव्यामध्ये टोल भरण्यावरून झालेल्या वादात नीतेश राणे यांना अटक झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी तोडफोड करून केलेले नुकसान राणे यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने राणे यांना लक्ष्य केले.    

Story img Loader