केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बुधवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवर बोलताना “जे गॅस सिलिंडर भरत असतील त्यांचं उत्पन्न जास्त असेल”, असं वक्तव्य केलं. तसेच ज्यांना गॅस सिलिंडर भरायचा त्यांना भरू द्या, असंही म्हटलं. विशेष म्हणजे यावेळी राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झालेली पाहायला मिळाली.
नारायण राणेंनी यावेळी महागाईचा अर्थसंकल्पाशी काय संबंध असं म्हटलं. यावर पत्रकार म्हणाले, “आधी गॅस सिलिंडरची किंमत ५००-७०० होती ती आता ११०० रुपये झाली आहे. गोरगरीबांना या महागाईत दिलासा मिळेल असं वाटत होतं. गृहिणींवर याचा मोठा परिणाम होत आहे.”
“ज्यांना गॅस सिलिंडर भरायचा त्यांना भरू द्या”
यावर राणेंनी गॅस सिलिंडर कोणी दिला असा प्रश्न विचारला. तसेच गॅस योजना, गरीबांना आवास योजना, मोफत अन्नधान्य योजना कोणी आणली असा प्रश्न विचारला. साडेतीन लाख कोटींची मोफत अन्नधान्य योजना असल्याचं म्हटलं. तसेच सर्व योजना गरीबांसाठी असल्याचं राणेंनी सांगितलं. यावर पत्रकारांनी तुम्ही गरीबांसाठी योजना आणली असली तरी गॅस ११०० रुपयांना झाल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर राणे म्हणाले, “ज्यांना गॅस सिलिंडर भरायचा त्यांना भरू द्या, म्हटले. तसेच जे भरत असतील त्यांची उत्पन्न जास्त असतील.”
अहमदाबादसाठी तरतूद होते, मात्र मुंबईसाठी तरतूद होत नाही यावर विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत आणि करायला लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. ते आमचं ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे.”
“तुम्ही पत्रकार नाही, शिवसेनेचे प्रवक्ते आहात”
सर्व सामान्यांना पेट्रोल, गॅस दरवाढीवर दिलासा मिळण्याची अपेक्षा यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले, “तुम्ही पत्रकार नाही, तर सोशल वर्कर झाला आहात किंवा शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात.” यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तसेच प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होत नाही. प्रश्न विचारणं आमचं काम आहे, असं स्पष्टपणे सुनावलं.
हेही वाचा : VIDEO: “अर्थसंकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा, मोदी सरकार…”, किसान सभेचा हल्लाबोल
“महागाईचा अर्थसंकल्पाशी काय संबंध?”
पत्रकारांनी आक्षेप घेतल्यानंतर नारायण राणे म्हणाले, “अर्थसंकल्प पूर्ण वाचा. अर्थसंकल्प खूप मोठा आहे आणि मी प्रत्येक गोष्टीवर सविस्तर सांगू शकत नाही. सविस्तर माहिती घेता येईल म्हणून मी पत्रकार परिषद सायंकाळी पाच वाजता घेतली. प्रत्येक तरतूद सांगता येणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीशी बोलताना तुम्ही ग्राह्य धरता हे काय आहे. तुम्ही जे बोलला त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे?”