शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं होतं. पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे हे उत्तम चेहरा आहेत, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. संजय राऊतांच्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर नारायण राणेंनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत काय म्हणाले होते?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता संजय राऊतांनी सांगितलं, “याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. पण, उद्धव ठाकरे हे एक उत्तर चेहरा आहेत. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो,” असं विधान संजय राऊतांनी केलं होतं.

हेही वाचा : “माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी आईने सभागृहात नेलं होतं, त्यामुळे…”, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

“उगाच काहीपण नाव नका घेऊ”

याबद्दल आज ( ८ मार्च ) नारायण राणेंना प्रसारमाध्यमांनी विचारताच त्यांनी थेट हातच जोडले. नारायण राणे म्हणाले, “जाऊदे… जाऊदे… हे म्हणजे कहर आहे. विधिमंडळात येत नाही. मातोश्रीतून बाहेर न पडता ते पंतप्रधान कसं बनणार. काय जेवण आहे का? ही चेष्टा आहे, त्या पदाची. उगाच काहीपण नाव नका घेऊ,” अशी टोलेबाजी नारायण राणेंनी केली आहे.

हेही वाचा : हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांनी दिलं उत्तर; नेमकं काय म्हटलं पत्रात?

“स्वप्नात रंगणारा आणि दंगणारा…”

पंतप्रधानपदाबाबतच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “माझ्या मनात असं कोणतंही स्वप्न नाही. स्वप्नात रंगणारा आणि दंगणारा मी नाही. जी जबाबदारी येते ती पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. कसं ते पद स्वीकारावं लागलं, त्या खोलात जाण्याची गरज नाही. मात्र, असं काहीही माझ्या मनात नाही. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी खांद्यावर घेणं गरजेचं आहे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane taunt on uddhav thackeray pm post sanjay raut comment ssa