नितेशने गुजरातींना नव्हे; तर मोदींचे कौतुक करणाऱयांना चलेजाव म्हटले होते. त्याच्या वक्तव्याचे आपण समर्थन करीत नाही. मात्र, काही लोक जनतेची दिशाभूल करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईत केला.
जर नरेंद्र मोदींमुळे गुजरात राज्याने मोठी प्रगती केली आहे. तर तेथून एवढ्या प्रमाणात मुंबईमध्ये स्थलांतर का होते, अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी २१ जून रोजी ट्विटरवर केले होते. या ट्विटवरून निर्माण झालेल्या वादावर नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला. गुजरात राज्याने उद्योगामध्ये केलेल्या प्रगतीचे दावे खोटे असल्याचा आरोप करून राणे म्हणाले, मोदींचे कौतुक करणाऱयांना गुजरातचा विकास झाल्याचे वाटत असेल, तर त्यांनी तिकडे जावे. जे मोदींचे कौतुक करतात, त्यांना उद्देशून नितेशने ट्विट केले होते. मुळात हे ट्विट २१ जूनचे आहे. आता एवढ्या महिन्यानंतर वाद उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काहीजण करताहेत.
पुत्र नितेश राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसलाच खड्डय़ात घालण्याचा ‘उद्योग’ नारायण राणे यांनी सुरू केला आहे, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही राणे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, नारायण राणेला कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गरज काय आहे. मी समर्थ आहे. कॉंग्रेसची प्रतिमा वाढविण्याचे काम मी करतोय. मतांच्या स्वार्थासाठी गुजरातींचा किंवा रामाचा उपयोग करणाऱया भाजपच्या नेत्यांसारखे आम्ही नाही.

Story img Loader