आसारामचा मुलगा नारायण साई याने विरारमध्ये सरकारी जागेवर बांधलेला अनधिकृत आश्रम अखेर गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून नारायण साईने या १० एकर जागेवर अतिक्रमण करून आश्रम बांधला होता.
विरार पूर्वेच्या शिरगाव येथे (सव्‍‌र्हे क्रमांक ४०१ क/१ आणि ३५५) या सरकारी गुरुचरण जागेवर आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याने ‘श्री नारायण साई संस्थान’ या नावाने हा आश्रम उभारला होता. २००५ पासून त्याने या १० एकर जागेवर अतिक्रमण केले होते. या आश्रमाला वेळोवेळी नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. गुरुवारी वसई विरार शहर महापालिका आणि वसई तहसिलदार कार्यालयाच्या पथकाने हा अनधिकृत आश्रम तोडण्यास सुरुवात केली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळी ६ पर्यंत सुरू होती.
चार सभागृह, प्रवचन हॉल, राहण्याची व्यवस्था व ६ गोशाळा येथे बांधण्यात आल्या होत्या, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) सुधाकर संखे यांनी दिली. ३ जेसीबी, ३० पालिका कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. गोशाळेतील ३० जनावरे आणि आश्रमाचे साहित्य पंचनामा करून आश्रमाच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केल्याची माहिती संखे यांनी दिली.

Story img Loader