Terrorist Attack by Coastal Way: अमली दहशतवाद्यांच्या कारवाया म्हणजे दहशतवादाला बळकटीच हे लक्षात आल्यानंतर आता सर्वच गुप्तचर यंत्रणांचे लक्ष त्यांच्याकडे आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर या अमलीदहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांमध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत सुमारे दीड हजार किलोग्रॅम वजनाचे आणि तब्बल सात हजार कोटी रुपये बाजारपेठीय किंमत असलेले अमली पदार्थ भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, दहशतवादविरोधी पथक, सक्तवसुली संचालनालय यांनी एकत्र कारवाई करून ताब्यात घेतले. अफगाणिस्तानातील अमली पदार्थ आता सागरी मार्गाने भारतात आणण्याची दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात आल्यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने बारकाईने नजर ठेवत तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आता तस्करांनी भारतात प्रवेश करण्यासाठी नवा सागरी खुश्कीचा मार्ग शोधल्याचे भारतीय नौदलाच्या लक्षात आले आहे.
दीड वर्षांत बदलले तस्करीचे मार्ग
अमली पदार्थांचे सर्वात मोठे उत्पादन हे अफगाणिस्तानात होते. इराण किंवा पाकिस्तान मार्गे ते भारतापर्यंत तस्करीच्या मार्गाने पोहोचवले जाते. तस्करी करणारे दहशतवादीच असतात आणि या तस्करीतून येणारा पैसा प्रामुख्याने दहशतवादासाठीच वापरण्यात येतो. अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागातील रिअर अॅडमिरल जनक बेवली यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला माहिती देताना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी मकरान किनारपट्टीचा वापर मोठ्या प्रमाणावर तस्करीसाठी केला जात होता. तिथून आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर मोठ्या बोटींमधून अमली पदार्थ नेऊन ते लहान आकाराच्या बोटींमधून भारतात खास करून गुजरात किनारपट्टीवर आणले जात. किंवा पाकिस्तानी ग्वादारसारख्या बंदरांचा वापर करून जवळच असलेल्या भारतीय किनारपट्टीवर गुजरातमधील बंदरांवर तस्करी केली जात असे. मात्र गेल्या दीड वर्षांत भारतीय नौदलाने आणि तटरक्षक दलाने अमलीदहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आता गेल्या चार महिन्यातच तस्करीचा मार्ग बदलण्यात आल्याचे नौदलाला लक्षात आले आहे.
26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेमकं काय बदललं? आपण काय धडा घेतला?
इराणहून मुंबई व्हाया श्रीलंका!
अमली दहशतवाद्यांच्या बदलेल्या मार्गाबद्दल रिअर अॅडमिरल बेवली म्हणाले की, आता लहान बोटींचा वापर करून इराण आणि पाकिस्तानमार्गे हा माल मालदिवपर्यंत आणण्यात येतो. भारतीय किनारपट्टीच्या जवळून जाणे टाळले जाते कारण इथे नौदलाची काटेकोर गस्त असते. त्यामुळे आता हा माल मालदीवहून थेट श्रीलंकेमध्ये नेला जातो. श्रीलंकेच्या किनारपट्टीहून भारतातील तामिळनाडूची किनारपट्टी जवळ आहे, तिथून हे अमली पदार्थ तामिळनाडूत आणि रस्त्याने मुंबई- पंजाबपर्यंत पोहोचवले जातात.
आता या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलासही भारतातर्फे माहिती देण्यात आली असून त्यांनीही कारवाई करत अलीकडेच मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ श्रीलंकेच्या किनारपट्टीवर पकडले. याशिवाय भारतीय नौदलाने आता श्रीलंका- भारत पट्ट्यामध्ये गस्त वाढवली आहे, असेही रिअर अॅडमिरल बेवली यांनी सांगितले.