मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल चार हजार ९२८ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ४०३६ किलो अमलीपदार्थांमध्ये सर्वाधिक एमडीसह हेरॅाईन, चरस, गांजा, कोकेन आदींचा समावेश आहे.
गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत दाखल झालेल्या ७०८ गुन्ह्यांमध्ये ८४४ आरोपींंना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १०२१ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ ‘एएनसी’ने जप्त केले होते. मुंबई शहरात तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण अमलीपदार्थांपैकी ९९ टक्के अमलीपदार्थ एकट्या एएनसीने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण अमलीपदार्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे ६१ टक्के एमडीचा समावेश आहे. त्या पाठोपाठ ३० टक्के गांजाचा समावेश आहे. याशिवाय ८ टक्के कोडेन या प्रतिबंधात्मक औषधांचाही समावेश आहे.
हेही वाचा: मुंबई: राज्यातील रिक्षा चालकांना हवे कल्याणकारी मंडळ; मॅक्सी कॅबला परवानगी देऊ नका, कारण…
मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने एका कारवाईत २५०० कोटी रुपयांचे एमडी जप्त करून विक्रमी कारवाई केली होती. आता याप्रकरणी सर्व आठ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईतील गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातून शमशुल्ला खान (३८) या तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने अंमलीपदार्थांच्या विक्रीच्या साखळीची माहिती मिळविली. अमलीपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी व रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह याच्यासह एकूण सात आरोपींना अटकही केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल एक हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचे ७०५ किलो एमडी जप्त केले होते.
हेही वाचा: मुंबई: राज्यात उद्यापासून गोवर लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू
प्रेमप्रकाशने पोलिसांच्या चाैकशीत गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या आणखी एका कारखान्याचे नाव उघड केले. प्रेमप्रकाश हा गिरीराज दिक्षित याच्याकडून एमडी बनवून घेत होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी या कारखान्यावर छापा मारण्यात आला होता. या कारवाईत गुन्हे शाखेने गिरीराज दिक्षित याला ताब्यात घेतले. तसेच ५१३ किलो एमडीसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची भुकटी आणि ३९७ किलो वजनाचे तपकीरी रंगाचे खडे असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या अंमलीपदार्थांची किंमत एक हजार २६ कोटी रुपये होती.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १५ डिसेंबरपासून अंमलीपदार्षविरोधात विशेष मोहीम राबविणार आहेत. याबाबतचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलीस ठाणी आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकांना दिले आहेत. मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.