डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी ‘सनातन’ तपासात पुढचे पाऊल
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) बुधवारी पनवेल येथे राहणारे डॉ. विरेंदर सिंह तावडे आणि पुणे येथे राहणारे सारंग अकोलकर यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केली असून त्यांना काही भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेलही मिळाले आहेत.
डॉ. तावडे आणि अकोलकर यांचे ‘सनातन संस्थे’शी घनिष्ट संबंध असल्याचे कळते. अकोलकर हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या स्फोटांमधील संशयित असून त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. तो फरारी म्हणून घोषित आहे. पुण्यात शनिवार पेठ परिसरातील त्याच्या घरावर छापा पडला आहे.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे ‘सनातन संस्थे’ सारख्या हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप सातत्याने डॉ. दाभोलकर आणि इतर कार्यकर्त्यांकडून होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही डॉ. दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी ‘सीबीआय’ कडून सुरू होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा