अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा पोलिसांना सुगावा अखेर मिळाला असून आरोपींना लवकरच अटक होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे दिली. तसेच तहलकाचे संपादक तरुण तेजपाल प्रकरणात केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 एका कार्यक्रमासाठी मुंबईत आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला १०० दिवस लोटल्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यातच दाभोलकर यांच्या हत्येमागे हिंदुत्ववादी शक्तींचा हात नसल्याचा खुलासा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. दाभोलकर यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगीने तीनच दिवसांपूर्वी आपली भेट घेतली होती.
तहलकाच्या महिला पत्रकाराच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण गोवा राज्याशी संबंधित असून त्यात केंद्र कोणताही हस्तक्षेप करणार नाही, तसेच कोणत्याही आरोपींना पाठीशी घालण्याची सरकारची कधीच भूमिका नाही, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. बलात्कारासंदर्भातील कायदा कमुकवत असल्याची पूर्वी सरकारवर टीका होत होती. मात्र त्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर आता हा कायदा खूप कडक झाल्याचीही टीका केली जात असल्याचे सांगत शिंदे यांनी तेजपाल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित एका महिलेवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणाबाबत भाष्य करण्यास शिंदे यांनी नकार दिला. मात्र या प्रकरणात मोदी यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवावर केल्याबाबत चौकशीनंतरच त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच बेकायदेशीर पाळत प्रकरणात कारवाईचे सर्वाधिकार केंद्र आणि राज्याच्या गृहसचिवांना असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्य सरकारशी चर्चा केली असता दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागला असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सरकारकडून मिळाली. आरोपींना गजाआड करण्यासाठी राज्य पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

Story img Loader