गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नावाने देशात वातावरणनिर्मिती केली जात असली, तरी ते फार काळ टिकणार नाही. सर्वाना बरोबर घेऊनच जावे लागेल, कोणालाही वगळता येणार नाही, असे प्रतिपादन मोदींचे नाव न घेता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी येथे केले. ‘बिहारी माणूस आपल्या डोक्यावर ओझे घेईल, मात्र त्याचे कोणावरही ओझे नाही. तो मेहनत करून खाणारा आहे, भीक मागणार नाही, असे परखड बोलही त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळून सुनावले. समाजवादी कार्यकर्त्यांनी केवळ संघटना न चालविता राजकारणात सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जयदेव डोळे व रंगा रायचुरे यांनी लिहीलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांच्या जीवनावरील ‘जॉर्ज-नेता साथी मित्र’ पुस्तकाचे प्रकाशन नितीशकुमार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण केंद्रात झाले. जॉर्ज फर्नाडिस यांचे सहकारी आणि न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रणजित भानू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बिहारचे मंत्री विजय चौधरी, आमदार देवेष ठाकूर, हिंदू मजदूर किसान पंचायतीचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस यावेळी उपस्थित होते.
नितीशकुमार यांनी मोदी, राज ठाकरे यांचे नाव घेण्याचे टाळले, तरी त्यांचा संदर्भ स्पष्ट होईल, अशा पध्दतीने टिप्पणी केली. बिहार दिनानिमित्त गेल्यावर्षी झालेल्या कार्यक्रमास विरोध झाला,याची आठवण करून देत बिहारी माणूस कोणावरही ओझे नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातून लोक बिहारला येतील..
जॉर्ज फर्नाडिसच नाही, तर आचार्य कृपलानी, मधू लिमये आदी महाराष्ट्रातील सर्वाना बिहारींनी आपले मानले, त्यांना प्रेम दिले. त्यांच्यावर पूर्ण श्रध्दा आहे. महाराष्ट्रात मात्र बिहारींना आपले मानले जात नाही. पण बिहारमध्ये ज्या वेगाने विकास सुरू आहे, ते पाहता महाराष्ट्रातून लोक बिहारला येण्याची वेळ येईल, अशी टिप्पणी आमदार ठाकूर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा