एक दिवसाच्या मुंबई दौऱयावर आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत पक्षाच्या राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मोदी थेट वांद्र्याल उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. उत्तरखंडमध्ये अडकलेल्या १५ हजार गुजराती नागरिकांची मोदी यांनी आपल्या भेटीवेळी सुटका केल्याचे वृत्त एका इंग्रजी राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. यावरूनच मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. मोदी यांनी राष्ट्रीय नेतृत्त्व करताना संपूर्ण देशाचा विचार करायला हवा, असा सूर ‘सामना’तील अग्रलेखामध्ये व्यक्त करण्यात आला होता. हा अग्रलेख प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आम्ही मोदीवर नव्हे; त्यांच्या प्रचारकांवर टीका केली, अशी सारवासारव केली. मोदी यांचे काम चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी यावेळी दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे स्वतः मोदी यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या गाडीपर्यंत आले होते.
मोदी यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा