पाच वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या ८४ किलो मीटर लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरण कोणत्याही परिस्थितीत डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) आणि राज्य सरकारला दिले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्याचे कामही डिसेंबर २०१८ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही मोदी यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल जवळील पळस्पे फाटा ते इंदापूर या ८४ किलो  मीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ‘एनएचएआय’ने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला २०११मध्ये दिले. मात्र या ठेकेदाराकडे पैसेच नसल्याने आणि बँकांनीही कर्ज देण्यास नकार दिल्याने प्रकल्पाचे काम  पाच वर्षांपासून रखडले होते. अखेर केंद्र सरकारने बँकांना हमी देत ठेकेदारास ५०० कोटी रूपये उपलब्ध करून दिल्यानंतर बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील ८४ कि.मी.पकी फक्त २८ कि. मी.चे चौपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काम संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यावर जिवघेणे अपघात होत असतानाही प्रकल्पाच्या कामास गती मिळालेली नाही.   पंतप्रधानांनी या प्रकल्पात लक्ष घातले असून त्यांनी बुधवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला. तीन टप्प्यांतील निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून पावसाळा संपताच ही कामे सुरू होतील आणि निर्धारित वेळेत म्हणजेच डिसेंबर २०१८ पर्यंत या संपूर्ण महार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी ग्वाही राज्य सरकारतर्फे पंतप्रधानांना देण्यात आली.

पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष

पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या या प्रकल्पाबाबत थेट चर्चा केली आणि आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पंतप्रधांनानी दिले. तर हरित लवादाच्या मान्यतेअभावी रखडलेले कर्नाळा येथील चौपदरीकरण मे अखेपर्यंत पूर्ण करावे, असे आदेशही त्यांनी दिले. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणावर पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष असेल, असेही त्यांनी सूचित केले.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi order about panvel indapur four laning