लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये २९३ जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्यांदा देशात सत्तेवर आली, तरी भाजपच्या घटलेल्या जागांची ठळक दखल अनेक परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांनी घेतली. बहुतेकांनी हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

यंदाचे वर्ष हे तीन मोठ्या लोकशाही देशांसाठी निवडणुकीचे आहे. भारत, ब्रिटन आणि अमेरिकेपैकी भारताची निवडणूक पहिली झाली आणि तिच्याकडे जगभरातील माध्यमांचे लक्ष लागून राहिले होते. सात टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेला अजस्रा मतदान कार्यक्रम अनेकांसाठी कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय होता. परंतु साऱ्यांचे लक्ष नरेंद्र मोदींकडे साहजिक लागले होते. मोदींचा करिष्मा यंदा चालला नाही आणि ही बाब त्यांच्यासाठी तसेच भाजपसाठी अतिशय धक्कादायक ठरते, असे ‘दि इकॉनॉमिस्ट’ या लंडनस्थित पत्राने म्हटले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपच्या पडझडीची दखलही ‘दि इकॉनॉमिस्ट’ने घेतली.

हेही वाचा >>>स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी, आयएएस अधिकारी सौरभ राव व डॉ. श्रीकांत परोपकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

स्थानिक पातळीवर असंतोष असूनही मोदींच्या करिष्म्यामुळेच भाजपला जरा बरी कामगिरी करता आली. परंतु मोदींच्या प्रचारतंत्रात नावीन्य राहिलेले नाही. त्यामुळे भविष्यात प्रतिकूल परिस्थिती असेल तर मोदी भाजपला तारू शकतील याची खात्री देता येत नाही, असा इशारा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिला आहे.

मोदींनी संसदेत बहुमत गमावले, अशा मथळ्याखाली ‘द गार्डियन’ने भारतातील निकालाची बातमी दिली. हे अतिशय अनपेक्षित होते, असेही या ब्रिटनमधील दैनिकाने म्हटले आहे. भाजपच्या जागांमध्ये ६०हून अधिकची घट झाली, याचे कारण बेरोजगारी, महागाई, वाढती विषमता आणि वादग्रस्त अग्नीपथ योजना असू शकते, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आले खरे, पण त्यांची ताकद घटली, असे ‘द फायनॅन्शियल टाइम्स’ या अग्रणी उद्याोगपत्राच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. भाजपप्रणीत आघाडी सरकारने बेरोजगारी आणि महागाई या समस्यांकडे आता अधिक लक्ष पुरवले पाहिजे, असे ‘द फायनॅन्शियल टाइम्स’ला वाटते.

तिसऱ्या कार्यकाळात मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करावी आणि पाकिस्तान सरकारने त्यांस सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे ‘द डॉन’ या पाकिस्तानी दैनिकाने त्यांच्या संपादकीयमध्ये सुचवले. तर मोदी सरकार हे अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण बनेल, असे ‘अल जझीरा’ वाहिनीने म्हटले आहे. या व इतर अनेक वाहिन्यांच्या होमपेजवर मंगळवारी बहुतेक काळ भारतीय निवडणूक ही मुख्य बातमी होती.