नागपूर / मुंबई : देश २०२९मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पाहण्यास इच्छुक आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ‘मोदी यांचा पुढील वारसदार महाराष्ट्रातून ठरेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तो ठरवेल’ असे भाकीत केल्यानंतर त्याला उत्तर देत ‘पंतप्रधान मोदी हे सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची काहीही गरज नाही’ असे फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले, की सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत: सक्षम आहेत. त्यांना प्रकृतीची कुठलीही अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही.

राऊत काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्रात भेट देत असल्याबद्दल संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होेते. डॉ. मोहन भागवत आणि संपूर्ण संघ परिवाराला देशाच्या नेतृत्वात बदल अपेक्षित असून त्यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असा दावाही राऊत यांनी केला. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही आपल्या इच्छेने निवडला जावा, असे संघाला वाटत असल्याचे ते म्हणाले.

वडील जिवंत असताना उत्तराधिकारी शोधणे ही आमची परंपरा नाही. ही मुघल संस्कृती आहे. तसाही उत्तराधिकारी होण्याशी आपला काहीही संबंध नाही. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री