मुंबई : कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आणि विशेष न्यायालयाने सुनावलेल्या कोठडीला जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अटक आणि कोठडीचा निर्णय अनावश्यक, मनमानी व बेकायदा असल्याचा दावा गोयल यांनी याचिकेत केला असून त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.
गोयल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्याआधी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आणि अटकेचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा गोयल यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान देताना केला आहे. आपल्याला अटक करताना पीएमएल कायद्याचे पालन करण्यात आलेले नाही. शिवाय, विशेष न्यायालयानेही या बाबी ईडी कोठडी सुनावताना विचारात घेतलेल्या नाहीत, असा दावाही गोयल यांनी याचिकेत केला आहे. तसेच, आपल्या अटक आणि कोठडीचा निर्णय बेकायदा ठरवून आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी गोयल यांनी केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर २० सप्टेंबर रोजी गोयल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांना मौल्यवान सामान सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी ‘डिजी लॉकर्स’,महत्त्वाच्या स्थानकात डिजी लॉकरच्या संख्येत वाढ
कॅनरा बँकेच्या कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सीबीआयकडे तक्रार करून फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप केला होता. तक्रारीनुसार, कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील शाखेत आणि १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात हा गुन्हा घडला होता. बँकेने ५ जून २०१९ रोजी जेट एअरवेजचे खाते बुडीत म्हणून घोषित केले होते. त्यानुसार, ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढ्या रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते. याबाबत बँकेने पडताळणी केली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळविल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे.
हेही वाचा >>> सेंट जॉर्ज रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग येत्या गुरुवारपासून सुरू होणार
गोयल यांना आजारी पत्नीशी बोलण्याची मुभा गोयल यांच्या मागणीनुसार, त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांची पत्नी अनिता यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे, त्यांच्या उपलब्धतेनुसार, गोयल यांना दररोज सकाळी आणि सायंकाळी १५ मिनिटे अनिता यांच्याशी बोलू देण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे. शिवाय, उशी, गादी वापरू देण्यासह घरच्या जेवणाचीही गोयल यांची विनंती न्यायालयाने मान्य केली.