मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या वादामुळे कायदेशीर कचाट्यात अडकलेले मतदान यंत्र (ईव्हीएम) परत मिळण्याच्या मागणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानेही उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विचारे यांच्या याचिकेमुळे अनेक मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक कार्यालयात अडकून पडली आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ही यंत्र मिळणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वतीने वकील अभिजीत कुलकर्णी यांनी न्यायालयात केला. त्यावर या प्रकरणात पुरावा म्हणून मतदान यंत्राची गरज होती का ? असा प्रश्न न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठाने उपस्थित केला. त्यावर, मतमोजणीचा निकाल आधीच निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे, या मतदान यंत्राची आवश्यकता नाही. तसेच, याचिकेसह जोडलेली कागदपत्रे आणि पुराव्यांवर याचिका आधारित असल्याचे विचारे यांच्या वतीने युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली.

हेही वाचा – म्हाडाच्या २,०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला सोडत, मुंबई मंडळाचे सोडतीचे वेळापत्रक जाहीर

हेही वाचा – पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा

दुसरीकडे, आपल्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती मतदारांना कळावी, यासाठी उमेदवाराने उमेदवारी अर्जात त्याचा खुलासा करणे अनिवार्य असतानाही म्हस्के यांनी त्यांच्या गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली, असा आरोप विचारे यांनी याचिकेतून केला आहे. त्यावर म्हस्के यांच्यावतीने वरिष्ठ वकील विक्रम नानकाणी यांनी उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितला. त्यांची विनंती न्यायालयाने मान्य केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mhaske mp challenge case election commission to high court to recover voting machine mumbai print news ssb