मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समीक्षक नरहर कुरूंदकर यांचा स्मृती विशेषांक ‘गोदातटीचे कैलासलेणे’ लोकाग्रहास्तव पुनप्र्रकाशित करण्यात आला आहे. ‘मराठी साहित्य परिषदे’ने या ग्रंथाचे प्रकाशन केले होते. त्यानंतर अनेक वर्षे हा ग्रंथ उपलब्ध नव्हता, मात्र वाचकांची मागणी असल्याने संस्थेने या ग्रंथाचे पुन्हा प्रकाशन केले आहे.

कुरुंदकर यांच्या निधनानंतर त्यांचे अप्रकाशित साहित्य आणि त्यांच्या साहित्याचे विश्लेषण करणारा ग्रंथ ‘मराठी साहित्य परिषदे’ने प्रकाशित केला होता, मात्र त्याच्या प्रती संपल्यानंतरही वाचकांकडून मागणी कायम राहिली. त्यामुळे ग्रंथाच्या झेरॉक्स प्रती काढून दिल्या जात होत्या. तरीही मागणी कायम असल्याने हा ग्रंथ पुनप्र्रकाशित करण्याचा निर्णय संस्थेने घेतला.

नरहर कुरुंदकर यांचे राजकीय चिंतन, पौर्वात्य तत्त्वज्ञानाविषयीचे त्यांचे विचार, इहलोकवादाविषयीचे त्यांचे विश्लेषण, कुरुंदकर यांची दलित साहित्यविषयक भूमिका, नाटय़शास्त्र व संगीतविषयक चिंतन इत्यादी गोष्टींचा समावेश विशेषांकात आहे. कवी मर्ढेकर यांच्याविषयीचे लेखन, १८ व्या शतकातील भारत असे कुरुंदकर यांचे अप्रकाशित साहित्य या विशेषांकात उपलब्ध आहे. गीता रहस्य या विषयावरील कुरुंदकर यांचे आकाशवाणीवरील भाषण, ‘मी आस्तिक का नाही ?’ या विषयावरील नांदेड येथील व्याख्यान या गोष्टीही विशेषांकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  प्राचार्य आणि साहित्य समीक्षक या दृष्टिकोनातून कुरुंदकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. त्यांचा जीवनपटही या विशेषांकात उलगडण्यात आला आहे. विशेषांकाच्या शेवटी त्यांच्या प्रकाशित लेखांची सूची देण्यात आली आहे.

व्याकरणाच्या नव्या नियमांनुसार लेखन एकूण ६०० पानांचा हा ग्रंथ ९०० रुपयांना उपलब्ध आहे. या मूळ ग्रंथाची छपाई जुन्या पद्धतीनुसार करण्यात आली होती. तसेच व्याकरणाच्या जुन्या नियमांनुसार लेखन करण्यात आले होते. नव्याने प्रकाशित आवृत्तीमध्ये व्याकरणाच्या नव्या नियमांनुसार लेखन करण्यात आले आहे. लवकरच या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ाचे आयोजन करण्यात येणार आहे.