राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर राजकीय संकट निर्माण झालं आहे. कोण शिवसेनेचा विधीमंडळातील गटनेता, कोण प्रतोद याविषयी ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यत्र नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी कायद्यानुसार पक्षाचा गटनेता निवडण्याचा अधिकार संबंधित पक्षाच्या प्रमुखाला असतो, असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून गटनेतेपदाबाबत होणाऱ्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, “शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन.”
“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो”
“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं,” अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.
“शिंदे गटाकडून २/३ बहुमताचं कोणतंही पत्र आलेलं नाही”
नरहरी झिरवळ पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांचं पत्र दिलं. ते मी स्विकारलं आहे. माझ्याकडे सुनिल प्रभु प्रतोद आहे हेच पत्र आलंय. त्या दिवशी देण्यात आलेल्या पत्रावर सुनिल प्रभु यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे. माझ्याकडे एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे २/३ बहुमत असल्याचं कोणतंही पत्र आलेलं नाही. दावा करणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.”
“अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही”
“विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्या नावासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल. त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाही,” असंही झिरवळ यांनी स्पष्ट केलं.