नाशिक : शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या आवारात मोटारीखाली सापडून चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित वाहन चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ध्रुव राजपूत असे बालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अजित राजपूत (३७, उपेंद्रनगर) यांनी तक्रार दिली. मुंबई-आग्रा महामार्गावरील एक्स्प्रेस इन हॉटेलच्या आवारात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयत बालकाचे वडील हे ओला, उबर कंपनीत नोंदणी घेऊन मोटार चालवितात. बुधवारी सायंकाळी ते ग्राहकाला सोडण्यासाठी मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा या दोघांना बरोबर घेऊन हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये गेले होते. ग्राहकाला हॉटेलमध्ये सोडत असताना त्यांची दोन्ही मुले आवारात खेळत होती. त्याचवेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारातून वेगाने आतमध्ये आलेल्या मोटारीखाली ध्रुव सापडला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याचे सांगितले जाते. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी संशयित चालकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.