मुंबई: म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून ४९३ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ही घरे असून या घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर ७ फेब्रुवारीपासून सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

सर्वसामान्यांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात खासगी विकासकाच्या प्रकल्पातील अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली घरे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकाने २० टक्के सर्वसमावेशक योजना आणली आहे. त्या योजनेनुसार मुंबई वगळता १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील ४००० चौ. मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पातील २० टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ती घरे म्हाडाच्या माध्यमातून सोडत काढून विकासकाच्या माध्यमातून विजेत्यांना वितरीत केल्या जातात. असे असताना नाशिकमधील विकासकांकडून मात्र २० टक्क्यातील घरे म्हाडाला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही योजना आपल्याला कशी लागू होणार नाही यासाठी विकासकांकडून पळवाटा शोधल्या जात आहेत. असे असले तरी म्हाडा आणि नाशिक मंडळ विकसकांकडून २० टक्क्यांतील घरे मिळावीत यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यानुसार नाशिक मंडळाला ४९३ घरे उपलब्ध झाली आहेत. त्या घरांसाठी जानेवारीत सोडत काढण्यात येणार होती. पण काही कारणाने या सोडतीस विलंब झाला आहे. पण आता मात्र या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसात ४९३ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

येत्या दोन ते तीन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून ७ फेब्रुवारीपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. महिनाभर सोडतपूर्व प्रक्रिया राबवून मार्चमध्ये घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. २० टक्के योजनेतील ही ४९३ घरे मोठ्या संख्येने अल्प गटातील असून काही घरे अत्यल्प गटातील आहेत. एक आणि दोन बीएचकेची ही घरे असून २९.९७ चौ.मीटर ते ४९.९६ चौ. मीटर क्षेत्रफळापर्यंतची ही घरे आहेत. अवध युटोपिया, मखमलाबाद येथील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसह सातपूर साई पार्क, यशोदा अपार्टमेंट पाथर्डी शिवार, अर्पण हाऊसिंग व्हिटागाव शिवार, जगन्नाथ हाइटस म्हासरूळ शिवार, रामबाग नाशिक शिवार, गणेश आरंभ पिंपळगाव, तुळसीबाग देवळाली यासह आदी प्रकल्पातील ही ४९३ घरे आहेत. या घरांच्या किंमती १२ लाख रुपये ते २५ लाख रुपयेदरम्यान आहेत. इच्छुकांनी आता कागदपत्रे जमा करून नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या तयारीला लागावे असे आवाहन नाशिक मंडळाकडून करण्यात आले आहे.

Story img Loader