देशातील दलितांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठाणे येथे बुधवारी १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दलित परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला देशातील सर्वपक्षीय दलित नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी दिली.
देशातील दलितांच्या कल्याणासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या समाजाची  म्हणावी तेवढी प्रगती झालेली नाही. त्यावर चर्चा करण्यासाठी व भविष्यातील दलितांच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यासाठी ही परिषद घेण्यात येणार आहे. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन  लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष खासदार रामविलास पासवान करणार आहेत. या परिषदेला भाजपचे रामनाथ कोविंद (उत्तर प्रदेश), इंडियन जस्टिस पार्टीचे उदित राज (दिल्ली), दलित पॅंथरचे नामदेव ढसाळ (मुंबई), गिता रेड्डी (उद्योग मंत्री, आंध्र प्रदेश), डॉ. कृष्णा स्वामी (तमिळनाडू), राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, कामगार नेते विजय कांबळे, आमदार भाई गिरकर आदी नेते उपस्थित राहणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत दलितांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Story img Loader