रसिका मुळ्ये
शालेय स्तरापासून कोडिंग शिकवण्याच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यातील ओझरत्या उल्लेखानंतर आता अगदी पूर्वप्राथमिक वर्गापासून ‘कोडिंग’ शिकवण्याची घाई खासगी शिकवण्या आणि ऑनलाइन शिकवण्यांना झाली आहे. येत्या काळात अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश होण्याच्या धास्तीने पालकांचा ओढाही कोडिंगच्या शिकवण्यांकडे वाढत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्यात शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना ‘कोडिंग’ शिकवण्याचे, स्वतंत्र विषय उपलब्ध करून देण्याची वाच्यता करण्यात आली आहे. त्याचा दाखला देत अगदी पूर्वप्राथमिक वर्गापासून कोडिंग शिकवणाऱ्या खासगी संस्थांचे पेव फुटले आहे. धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर सहावीपासून अभ्यासक्रमांत कोडिंगचा समावेश होणार म्हणून धास्तावलेल्या पालकांनी आत्तापासून शिकवण्या लावून त्याची तयारी सुरू केली आहे. दूरचित्रवाणी, समाजमाध्यमांवर झळकणाऱ्या कोडिंग शिकवण्यांच्या जाहिराती पालकांना भुरळ घालत आहेत.
पूर्व प्राथमिक शाळांच्या देशपातळीवरील एक साखळी त्यांच्या अभ्यासक्रमात कोडिंगचा समावेश केल्याची जाहिरातबाजी करत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अॅप विकसित करणाऱ्या, साहित्यनिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांनीही आता आपला मोर्चा कोडिंग शिकवण्याकडे वळवला आहे. स्थानिक पातळीवरील संगणक शिकवण्यांचा कारभार टाळेबंदीच्या काळात काहीसा थंडावल्यानंतर आता अनेक शिकवण्यांनी शालेय विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्याचे वर्ग सुरू केले आहेत.
शाळांचे संधान
सध्या काही शाळांनीही कोडिंग शिकवण्यांसाठी खासगी संस्थांशी संधान बांधले आहे. शाळेचा वर्षांचा प्रकल्प म्हणून हे अभ्यासवर्ग करणे शाळांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळेच्या ऑनलाइन तासिकांबरोबरच कोडिंगची शिकवणी विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.
शुल्क ५ हजार ते २५ हजार
* मुले एखादा ऑनलाइन गेम किंवा संगणकीय खेळ स्वत: विकसित करू शकतील असा शिकवण्यांचा दावा.
* अगदी पहिलीपासून कोडिंग शिकवण्याचे शिकवण्यांचे दावे.
* शालेय स्तरापासून कोडिंग शिकवणाऱ्या शेकडो ऑनलाइन शिकवण्या.
* तीन महिने ते वर्षभराच्या कालावधीचे अनेक अभ्यासक्रम.
* प्राथमिक स्तरावरील अभ्यासवर्गाचे शुल्क पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत.
अनेक संस्थांनी मोफत साहित्य देऊ केले आहे. एमआयटी, गुगल यांनी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. लाखो रुपये खर्च करून शिकवण्याची आवश्यकता नाही.
– चेतन एरंडे, पालक
अनेक संगणकीय भाषा आहेत. अडीच वर्षांच्या मुलापासून हे शिकवता येते. मात्र त्यात काय शिकवावे हे महत्त्वाचे असते. मुलांचा तार्किक दृष्टिकोन विकसित होतो. मुले उपकरणे हाताळतात त्याला योग्य दिशा मिळू शकते.
– अंबुजा साळगावकर, प्राध्यापिका, मुंबई विद्यापीठ