मुंबई : आदिवासी बहुल भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, आव्हाने, मर्यादित संसाधने, उपलब्ध दळणवळणाची साधने आणि कमी सकल नोंदणीचे प्रमाण आदी विविध अनुषंगिक बाबींवर मात करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नुकतेच मुंबई विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली.

दोन दिवसीय या कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाप्रमुख, शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून पुढील आठवड्यात तलासरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : रणजी क्रिकेटमध्ये निवड करण्याचे आमिष दाखवून पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंची ६३ लाख रुपयांची फसवणूक

एकविसाव्या शतकातील आवश्यक प्रमुख कौशल्ये, अनुभवाधारीत शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सात्मक विचार रुजवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे नियोजन करण्यात आले आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शहरी, ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांतील महाविद्यालयांचा समावेश होत असून जव्हार सारख्या दुर्गम भागातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीला अनुसरून कौशल्याधारीत आणि अधिक समग्र अभ्यासक्रमांची जोड देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

Story img Loader