राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट- ‘एनजीएमए’) हे रीगल सिनेमाच्या चौकातलं पाच मजली खरोखरच भव्य कलादालन केंद्र सरकारच्या मालकीचं असलं, तरी गेल्या १० वर्षांत या दालनानं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांच्या कलाकृती संग्रहित केल्या होत्या. ए. ए. (अब्दुलरहिम अप्पाभाई) आलमेलकर या अवघी ६२ र्वष (१९२० ते १९८२) जगलेल्या महत्त्वाच्या चित्रकाराच्या कलाकृतींचा मोठा ठेवाच या दालनाच्या संग्रहात आधीपासून आहे. त्यात बाहेरील काही कलाकृतींची मुद्दाम भर घालून सुहास बहुळकर यांनी ‘आलमेलकर : प्रेरणा आणि प्रभाव’ नावाचं चार मजली प्रदर्शन सिद्ध केलं आहे. या प्रदर्शनाचा तळमजला हा ‘आलमेलकर शैली’चा प्रभाव दिसणाऱ्या चित्रकारांच्या चित्रांनी सुरू होतो.. सुदाम डोके, विनायक गोडकर, सविता केळकर अशी मराठी कलाप्रेमींनी कधी ना कधी (छापील स्वरूपात तरी) पाहिलेली- वाचलेली नावं एकीकडे, तर ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ची रेषा-रंग-अवकाश यांच्या भारतीय हाताळणीची परंपरा दुसरीकडे, अशा या मजल्यावरून आपण आलमेलकरांच्या चित्रांकडे जातो. इथून आलमेलकरांची रेखाचित्रं आणि रंगचित्रं सुरू होतात.. सोबतच्या भिंतफलकांवर सुहास बहुळकरांचं निवेदनासारखं रसाळ आलमेलकराख्यान आपली साथ करणार असतं. आलमेलकरांनी एकच रचनाचित्र पुन:पुन्हा विविध रंगसाधनांनी करण्यातही हयगय केली नाही (सोबतचं चित्र पाहा. ते कागदावर जलरंगांत आहे, पण तसंच्या तसं एक चित्र कॅन्व्हासवरही आहे), किंवा त्यांनी रेखाचित्रं भरपूर केली- कॅमेऱ्याइतक्याच चपळाईनं त्यांनी लोकजीवन टिपलं- असे स्तिमित करणारे तपशील आपल्याला प्रेक्षक म्हणून कळत राहातात. आलमेलकरी रेषेचा डौल आणि त्यांच्या घनगर्द रंगांची लय आपल्या डोळ्यांत उतरत राहातो.. आणि आपण मजले चढत राहातो! आलमेलकरांनी दोन प्रकारची रेखाचित्रं केली- एकतर मोठय़ा रंगीत रचनाचित्राचा आराखडा म्हणून, तर दुसरा प्रकार म्हणजे अभ्यासासाठी. यापैकी अभ्यासचित्रांचा भर आदिवासी लोकजीवनावर आहे. किती चौकस नजरेनं हा चित्रकार जग पाहात होता, हे त्यातून कळतं. ‘भारतीय आधुनिकता’ आपल्या चित्रांत आणण्यासाठी हे परिश्रम आलमेलकरांनी घेतले. ड्रॉइंगची आवड असलेल्या मुलांनाही सुट्टीत आवर्जून दाखवावंच, असं हे प्रदर्शन आहे. ते ३० जूनपर्यंत सुरू राहणार असून शनिवार/रविवारीही (संध्या. ५.३० पर्यंतच) हे दालन खुलं राहात असल्याने ‘आम्ही मुंबईबाहेर राहातो’ हेही कारण अजिबात चालणार नाही!
जगाशी जोडलेला विदर्भ!
या सदरात कलादालनांचे पत्ते पहिल्या काही ओळींतच दिले जातात, पण प्रभाकर पाचपुतेच्या प्रचंड ड्रॉइंग्जच्या प्रदर्शनाचा पत्ता निराळा सांगण्याची गरजच नाही. आलमेलकरांच्या प्रदर्शनानंतर, ‘एनजीएमए’चाच पाचवा पूर्ण वर्तुळाकार मजला अख्खा प्रभाकर पाचपुते याच्या चित्रांचा आहे. तिशीच्या उंबरठय़ावरला हा चित्रकार मूळचा विदर्भातल्या चंद्रपूरचा, त्यातही कोळसाखाणींच्या भागातला. शेतकरी, खाणकामगार यांचं आयुष्य जवळून पाहाताना त्याला जे प्रश्न पडत होते ते आज महत्त्वाचे आहेत, याखेरीज ‘स्थलांतर’ हा प्रश्नही अविकसित भागांसाठी महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्याला होत गेली. खरागड, बडोदे आणि मुंबई इथल्या वास्तव्यात (तसंच, कलाकृती आरेखित-प्रदर्शित करण्यासाठी पॅरिस, साओ पावलो, ब्रिस्बेन अशा त्रिखंडांतून निमंत्रणं मिळाल्यामुळे तिथल्या दीर्घ प्रवासांत) त्याची कला समृद्ध झाली खरी; पण ‘चारकोलनं भिंतीवर रंगवणं’ ही चित्रपद्धत त्यानं सोडली नाही! इथेही सर्वच्या सर्व भिंतीवर चारकोलनं केलेली मोठी चित्रं आहेत.. त्यापैकी एक विदर्भातल्या कापसाचं आहे, दुसरं बंद पडलेल्या कोळसाखाणीचं आहे, हे चटकन ओळखता येईल. पण, इथं प्रभाकरनं केवळ विदर्भाच्या व्यथा मांडल्या नसून जगातल्या श्रमिकांशी नातं जोडलं आहे.. ‘विकासा’चं गलबत लोकशाहीच्या नदीतून नीट पैलतीराला लागण्याऐवजी भलत्याच कुठल्याशा अदृश्य टेकाडावर जाऊन रुततं, वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या टोळांसारखी माणसं शहरांकडे स्थलांतर करतात आणि मग शहरी सूटबूटवाले जमिनीवर ताबा मिळवत राहातात.. हा कुठल्याही शेतकऱ्याचा अनुभव प्रभाकरनं मांडला आहे, तो पाहणं हे चित्रकलेत रस नसलेल्यांचंही कर्तव्य आहे (प्रदर्शनात प्रत्येक चित्राची माहिती देणारा एक मोठा कागद मिळतो, तो सध्या इंग्रजीतच आहे).
शनिवारची संध्याकाळ..
भायखळय़ाच्या राणीबागेच्या आवारातच राजवाडय़ासारखं ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ आहे. तिथं मागल्या बाजूला दादरचे दिवंगत फोटोग्राफर आणि ‘इंडिया फोटो स्टुडिओ’चे संस्थापक जे. एच. ठक्कर यांनी टिपलेल्या, जुन्या हिंदी चित्रपट तारे-तारकांच्या फोटोंचं प्रदर्शन भरलं आहे. याच संग्रहालयात, किशोर सिंग यांचं ‘परदेशस्थ भारतीय चित्रकार’ अशा विषयावरलं व्याख्यान शनिवारी आहे, त्यासाठी ccardoza@bdlmuseum.org या पत्त्यावर ईमेल पाठवून पूर्वनोंदणी करावी लागेल.
यापेक्षा आणखी निराळंच काही हवं असेल, तर कुलाब्याला पार पुढे- कुलाबा अग्निशमन केंद्राच्या बसस्टॉपनंतर डाव्या हाताच्या ‘नारायण आत्माराम सावंत मार्गा’च्या टोकाला जी गोदामवजा ‘बीएमपी बिल्डिंग’ आहे, तिथं जायला हवं. ‘परफॉर्मन्स आर्ट’ असते तरी कशी? नाटक किंवा एकपात्री अभिनयापेक्षा ‘परफॉर्मन्स आर्ट’ निराळी कशी? या प्रश्नांची उत्तरं इथं २३ एप्रिलच्या संध्याकाळी मिळू शकतील.. कारण नेहा चोकसी यांच्या मुद्राचित्रांचं प्रदर्शन चोकसी यांच्याच ‘परफॉर्मन्स’नं इथं सुरू होणार आहे! तेव्हा कुतूहलापायी तरी नक्की जा.
गॅलऱ्यांचा फेरा : आलमेलकरांची ‘राष्ट्रीय’ आधुनिकता
गेल्या १० वर्षांत या दालनानं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांच्या कलाकृती संग्रहित केल्या होत्या.
आणखी वाचा
First published on: 21-04-2016 at 03:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National gallery of modern art in mumbai