मुंबई : १०७ वर्षांची समृध्द परंपरा असलेली वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, १० फेब्रुवारी २०२५ रोजी पहिल्या एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार असून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या बालकुमार साहित्य संमेलनाला बी. पी. ई. शाळेचे विद्यार्थी गणेश वंदना आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन सुरुवात करणार आहेत. या संमेलनाच्या पहिल्या सत्रात कवी संमेलन भरवण्यात येणार असून सदानंद पुंडपाळ, रवींद्र सोनवणे, प्रतिभा जगदाळे, श्रीकांत पेटकर, वीरभद्र मिरेवाड, मोहन काळे, तसेच बी. पी. ई शाळा आणि अनुयोग विद्यालयाचे विद्यार्थी या कवी संमेलनात सहभागी होणार असून बालसाहित्यकार आणि प्रकाशिका ज्योती कपिले या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’, पुणे निर्मित, संध्या कुलकर्णी लिखित आणि प्रसाद कुलकर्णी दिग्दर्शित ‘जीर्णोध्दार’ हे बालनाट्य सादर होणार आहे. याशिवाय, संस्थेचे बालकलाकार काही नाट्यछटाही सादर करणार आहेत.
कथाकथन सादरीकरणाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला असून कथाकथनकार विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात रंजना सानप, बबन शिंदे, मेघना साने, सतीश चिंदरकर, विजार खांबये (अनुयोग विद्यालय), सर्वेश ठोटम (अनुयोग विद्यालय), मनश्री राणे (अनुयोग विद्यालय) सहभागी होणार आहेत. या संमेलनाचा समारोप एकनाथ आव्हाड यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी आणि त्यांच्या साहित्यविषयक जाणिवा समृध्द व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे बालकुमार साहित्य संमेलन विनामूल्य असून अधिकाधिक शिक्षक, पालकांनी मुलांसह या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी केले आहे.