अजी व्ही. एन. हे गेली अनेक वर्षे झाडांचीच चित्रं काढतात. सुमारे २० वर्षांपूर्वीपासून काळय़ा कागदावर कुठल्याही रंगीत पेस्टल-खडूनं काढलेली चित्रं, पिवळट कागदावर चारकोलनं केलेली चित्रं, या सर्वात झाडं हा महत्त्वाचा घटक असतोच. ही झाडंही वडापिंपळाची नव्हेत. साधीच नेहमीची मध्यम वाढीची झाडं. झाडांसोबत ओघानंच येते म्हणून जमीन आणि मग वर आकाश असतंच म्हणून त्यात ढग वगैरे. एवढंच त्यांच्या चित्रांमध्ये. आता कुणी म्हणेल, याला तर ‘निसर्गचित्रं’ म्हणतात! बरोब्बर.. पण अजी यांच्याबाबत मात्र हा सरळ हिशेब चुकतो. म्हणजे निसर्ग आहे, त्याचं चित्रही आहे. पण तरीही ते फक्त निसर्गचित्र नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झाडं आणि आभाळ किंवा झाडं आणि जमीन यांचं नातं अजी यांच्या चित्रांत असं काही दिसतं की एकतर, काळवेळ कळणं मुश्कील. रात्र आहे की दिवस आहे हे कळेलही एकवेळ, पण दुपार आहे की सकाळ की संध्याकाळ, हे जसं अन्य निसर्गचित्रांत प्रकाशामुळे कळतं, तसं अजी यांच्या चित्रांत अजिबात कळत नाही. उलट हा प्रकाश असा काही फिरवलेला असतो की चित्रातला निसर्ग थिजल्यासारखा भासतो. स्तब्ध दिसतो. त्या प्रकाशामुळे आणि स्तब्धतेमुळे चित्रं गूढ वाटू लागतात. झाडांच्या तपशिलांमध्येही प्रकाशाची- पर्यायानं रंगछटांचीच- योजना अशी काही असते की, ही गूढता अधिकच वाढावी.

वास्तवातीत आणि गूढ अशा आकारांचं दर्शन घडवणारा ‘सर्रिअ‍ॅलिझम’ हा कलाप्रवाह आठवावा, अशीच अजी यांची चित्रं आहेत. यंदाच्या प्रदर्शनात विशेषत, त्यांनी नेहमीप्रमाणे कागदावर ड्रॉइंगप्रमाणे चित्र न करता कॅनव्हासवर तैलरंगांनी चित्रं रंगवली असल्यामुळे हे साम्य अधिकच लक्षात येतं. गोठलेलं आभाळ, जिथे चित्रकाराला हवी तिथेच हालचाल आणि तिही गूढता वाढवणारीच हालचाल, फिक्या आणि गडद रंगांचा मेळ, एकाच रंगाला प्राधान्य देताना परिचित वस्तूंचे वा घटकांचे नेहमीचे रंग डावलणं, या छोटय़ा-छोटय़ा हरकतींद्वारे एकंदर चित्रातल्या वातावरणात अविश्वसनीयता आणवणं असे सर्रिअ‍ॅलिझमच्या तंत्राचे भाग या चित्रांमध्ये आहेत. पण तरीही या चित्रांना सरसकट सर्रिअ‍ॅलिस्ट ठरवता येणार नाही. त्यांचा संबंध पौर्वात्य गूढवादाशी मात्र जोडता येईल, अशी ग्वाही अजी यांच्या चित्रांमधला स्वप्नवत अवकाश देत राहातो.

कुलाब्याला ताजमहाल हॉटेलच्या मागच्या ‘मेरीवेदर रोड’वर ‘सनी हाऊस’ नावाची इमारत आहे. तिथं लाकडी जिन्यानं पहिल्या मजल्यावर जाऊन मोठय़ा लाकडी दाराची बेल दाबलीत (आणि दार उघडलं जाईपर्यंत धीर धरलात,) तर ही चित्रं ३० सप्टेंबपर्यंत पाहायला मिळतील.

मोरपारियांची व्यंगदृष्टी

सोबतचं छायाचित्र पाहा.. वाकलेले, मुडपलेले चमचे हारीनं मांडलेले दिसतील. पण ते अशा रीतीनं मांडलेत की एक नेता आणि बाकी सारे अनुयायी, असं लक्षात यावं.. मुंबईचे विख्यात व्यंगचित्रकार हेमंत मोरपारिया यांचं हे ‘व्यंगशिल्प’ आहे आणि त्या शिल्पाचं नाव आहे- ‘चमच्याज् डूइंग योगा’! यातल्या विनोदाचा रोख योगदिनावरच आहे हे आपल्याला कसं कळतं? अर्थातच दृश्यातून.. म्हणजे आपण आधी योगदिनाचीही दृश्यं (छायाचित्रांमध्ये तर हमखासच) पाहिली आहेत आणि आत्ता हे शिल्पही तसंच दिसतंय, म्हणून. हा दृश्यानुभव देणारे, या अर्थानं मोरपारिया हे एकप्रकारे समकालीन दृश्यकलावंतच आहेत. व्यंगचित्रकारांची खास प्रदर्शनं पाश्चात्त्य देशांत भरतात, व्यंगचित्रांची खास संग्रहालयंही तिथं आहेत, पण भारतात फक्त व्यंगचित्रं मांडत राहणारी जागा निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वीच अनेकदा झाले. त्यामुळे ‘साक्षी गॅलरी’नं आपल्या ‘साक्षी सलॉन’ या नव्या जागेत हेमंत मोरपारियांसारख्या मुरब्बी व्यंगचित्रकाराला संधी देणं, हे चांगलंच झालं आहे. ‘मोटाभाई इज वॉचिंग यू’ हे चित्र नागरिकांनाच जबाबदार धरण्याच्या नीतीवर भाष्य करणारं आहे. तर एका चित्रात एक गाय बसली आहे आणि तिला धक्का लावण्याची हिम्मत कोण करणार, म्हणून तिच्या बसण्याच्या जागेपुरता वळसा घालून एक रेल्वेलाइन गेली आहे, असं दिसतं. ‘होली काऊ’ या शीर्षकाचं हे व्यंगचित्र गोमातास्तोमावर भाष्य करतंच, पण ती रेल्वेलाइन बुलेट ट्रेनची आहे, असं याच चित्रातून स्पष्ट झाल्यानं विरोधाभासातून विनोदनिर्मिती होते! अशी अनेक चित्रं इथं आहेत. ही राजकीय टीका नव्हे.. टीका खुसखुशीतपणे जर करायची असेल तर ती कशी करता येते, याचं दर्शन मोरपारियांनी घडवलं आहे.

रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या (किंवा मेरिवेदर रोड संपल्यावर उजवीकडे वळल्यास) रस्त्यावर ‘ग्रँट बिल्डिंग’ आहे, तिच्या दुसऱ्या मजल्यावर ‘साक्षी गॅलरी’ आणि आता त्याच मजल्यावर समोर ‘साक्षी सलॉन’ आहे. तिथं मोरपारियांचं प्रदर्शन ९ सप्टेंबपर्यंत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature pictures exhibition sunny house art gallery