गेल्या महिन्याभरापासून चाललेल्या नाटय़ परिषद निवडणुकीच्या ‘नाटका’च्या नव्या अंकाची नांदी मंगळवारी झाली. मुंबई विभागात तब्बल १९९९ बनावट मतपत्रिका सापडल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीने दिल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी जाहीर केली. त्याचप्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया मुंबईपुरती रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पण उर्वरित महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल तसेच राहतील, असे त्यांनी सांगितले.
नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान १२५७ मतपत्रिका बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी ठाकूर यांनी त्याच्या छाननीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. मंगळवारी या समितीने तपासणी केली असता आणखी ७४२ मतपत्रिका बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबईतील निवडणूक प्रक्रिया रद्द करत असल्याचे ठाकूर यांनी जाहीर केले. या निर्णयानंतर मोहन जोशी, प्रदीप कबरे व प्रमोद पवार यांच्या तिन्ही पॅनल्सनी एकत्र येत निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध केला. बनावट किंवा अवैध मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करावी अशी तरतूद घटनेत असताना निवडणूक रद्द करण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी विचारला. धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय कायम राखल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही तिन्ही पॅनल्सनी केली आहे.
नाटय़ परिषदेची मुंबईतील निवडणूक प्रक्रिया रद्द
गेल्या महिन्याभरापासून चाललेल्या नाटय़ परिषद निवडणुकीच्या ‘नाटका’च्या नव्या अंकाची नांदी मंगळवारी झाली. मुंबई विभागात तब्बल १९९९ बनावट मतपत्रिका सापडल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीने दिल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी जाहीर केली. त्याचप्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया मुंबईपुरती रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
First published on: 20-02-2013 at 04:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natya parishad election of mumbai preceedure cancel