मराठी रंगभूमीच्या भरभराटीसाठी आणि उन्नतीसाठी विविध योजना आखल्याचा आणि नाटय़सृष्टीला नवीन दिशा दाखवत असल्याचा दावा करणाऱ्या अखिल भारतीय नाटय़संमेलनामुळे सध्या काही नाटकांच्या तालमी मात्र चांगल्याच रखडल्या आहेत. ठाण्यात होणाऱ्या ९६व्या नाटय़संमेलनाचे कार्यालय थाटण्यासाठी संमेलनाचे आयोजक असलेल्या नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेने राम गणेश गडकरी रंगायतन येथील तालीम हॉलची निवड केली आहे. त्यामुळे तालमी वा विविध कार्यशाळा घेण्यासाठी या तालीम हॉलचे आरक्षण महिनाभर आधी करणाऱ्या नाटय़कर्मीची  चांगलीच पंचाईत झाली आहे.

९६वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन यंदा १९ ते २१ फेब्रुवारी यादरम्यान ठाण्यात होत आहे. या संमेलनाचे आयोजक असलेल्या नाटय़ परिषदेला संमेलनाच्या एकंदरीत तयारीसाठी तात्पुरते कार्यालय स्थापन करावे लागणार आहे. संमेलनाशी संबंधित कार्यकर्ते, कलाकार यांना एकत्र येऊन भेटीगाठी, पुढील नियोजनाच्या दृष्टीने चर्चा यासाठी एक केंद्र म्हणून हे कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. आता संमेलन महिनाभरावर येऊन ठेपले असताना नाटय़ परिषदेने शुक्रवारी गडकरी रंगायतनमधील तालीम हॉलमध्ये कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र उद्घाटनानंतर या ‘कार्यालया’त काहीच घडामोड झालेली नाही. तसेच या तालीम हॉलला टाळे लावून ते बंदच ठेवण्यात आले आहे.

या तालीम हॉलमध्ये नेहमीच वेगवेगळ्या संस्थांच्या नाटकांच्या वा नृत्यांच्या तालमी होतात. तसेच ठाण्यातील होतकरू कलाकारांसाठी कार्यशाळाही घेतल्या जातात. त्यासाठी तालीम हॉलचे आरक्षण महिना-दोन महिने आधीपासूनच करावे लागते. मात्र आता येथे नाटय़ परिषदेचे संमेलनासाठीचे कार्यालय थाटणार असल्याने तालीम हॉल बंद असल्याचे संस्थांना तोंडीच सांगण्यात येत आहे. आगाऊ आरक्षण केल्यानंतर अचानक तालीम हॉल वापरास मिळणार नाही, असे ऐकावे लागत आहे. अशा वेळी आमच्यासारख्या होतकरू नाटय़कर्मीनी काय करायचे? नाटय़कर्मीना तालीम करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था नसल्याने आमची चांगलीच पंचाईत होत आहे, असे एका संस्थाचालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

याबाबत नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष नरेंद्र बेडेकर यांना विचारले असता तालीम हॉलची जागा कार्यालयासाठी अपुरी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्घाटन या जागेत झाले असले, तरी आम्ही जवळच असलेल्या दोन-तीन जागांची चाचपणी करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.