Terrorist Attack by Marine Way: पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात १९७१ साली ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे काम केले. त्या वीरतेच्या आठवणी जागवण्यासाठी प्रतिवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलातर्फे ‘नौदल दिन’ साजरा केला जातो. तर त्या आधीचा आठवडा ‘नौदल सप्ताह’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने २००८ साली तत्कालीन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुरीश मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला विशेष मुलाखत दिली. जगभर सागरी चाच्यांच्या कारवाया वाढत होत्या. दहशतवाद्यांच्या कारवायाही वाढत होत्या. त्या संदर्भातील मुलाखतीमध्ये अ‍ॅडमिरल मेहता म्हणाले, जगभरातील गुप्तवार्ता संकलन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीजचे म्हणणे आहे की, जगातील दुसरा मोठा दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने असेल. ही मुलाखत प्रसिद्ध होत असतानाच पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला लक्ष्य केले होते. मुलाखत प्रसिद्ध होणे आणि मुंबईवर सागरी मार्गानेच हल्ला होणे, यांची एकाएकी गाठ पडली!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते म्हणाले होते, “समुद्रांवर बारीक नजर ठेवावी लागेल!”

अॅडमिरल सुरीश मेहता यांनी नौदल प्रमुख होण्याआधी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष अर्थ होता. त्याच मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, येणाऱ्या काळात जगातील समुद्रावर, महासागरांवर खूप बारीक नजर ठेवावी लागणार आहे. भारतासारख्या देशासाठी हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण आपल्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे. पूर्वी केवळ पश्चिमी किनारपट्टी संवेदनशील होती. पण आता बंगालच्या उपसागरात चीनच्या कारवाया वाढल्याने तिथेही लक्ष द्यावे लागणार आहे. तटरक्षक दलालाही त्यांची कामगिरी चोखपणे पार पाडावी लागेल आणि त्याचप्रमाणे जमिनीवर कार्यरत असणाऱ्या कस्टम्स आणि पोलीस आदी यंत्रणांनाही ‘सागराचा आमचा काय संबंध?’ अशी भूमिका घेऊन चालणार नाही. उलट सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करणे आवश्यक असणार आहे.

26/11 Mumbai Terror Attack: मुंबई हल्ल्याआधी ‘या’ ऑपरेशनला आलेलं अपयश भोवलं! नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

हल्ला फक्त कुठे आणि केव्हा हाच प्रश्न उरला होता…

मैत्रीपूर्व संबंध असलेले जगभरातील देश एकमेकांशी गोपनीय माहितीची देवाणघेवाण करत असतात. अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेबरोबरच प्रगत राष्ट्रांनी दहशतवाद्यांच्या कारवायांच्या संदर्भातील माहितीची देवणाघेवाण वाढवली; कारण दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे हे सर्वांनाच मान्य होते. याच गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीत हे पुरते स्पष्ट झाले होते की, सागरी मार्गाने मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. मात्र तो कुठे आणि केव्हा हाच प्रश्न होता. हल्ल्याच्या काही दिवस आधी दिलेल्या या मुलाखतीत नौदल प्रमुखांनी हे स्पष्टच सांगितले होते.

देशाच्या सागरीसुरक्षेसाठी पुढील ३६ तास महत्वाचे; जाणून घ्या ‘ऑपरेशन सी व्हिजिल’!

नेमका ‘तो’च धडा आपण विसरलो!

जर एवढी माहिती होती… तर मग नेमकं चुकलं कुठे? २६/११ च्या हल्ल्यानंतर असे लक्षात आले की, नौदल आणि तटरक्षक दलाला याची कल्पना देण्यात आली होती. ‘काटेकोरपणे सारे तपासा’ हेही सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दहशतवाद्यांनी वापरलेल्या ‘कुबेर’ या बोटीवर कागदपत्रांची तपासणी केली खरी; पण बोटीची तपासणी केली नाही. दहशतवाद्यांकडे खोटी ओळखपत्रे होती. जे दिसते आहे, त्यावर विश्वास ठेवून तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जाऊ दिले आणि दहशतवादी मुंबईत पोहोचले. खरे तर सागरी चाच्यांवर कारवाई करताना हे लक्षात आले होते की, सागरी चाचे बनावट कागदपत्रांच्या आधारे सागरावर आपल्या कारवाया करत राहतात. नेमका ‘तो’च धडा आपण विसरलो!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naval chief in his interview told before terrorist attack that next terror attack will be by sea vp