भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ फ्रिगेट असलेल्या आयएनएस तलवारने सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या रत्नागिरीनजिक भर समुद्रात दिलेल्या धडकेनंतर एका मासेमारी ट्रॉलरला जलसमाधी मिळाली. ट्रॉलरवरील सर्वच्या सर्व २७ जणांचे प्राण वाचविण्यात नौदलाला यश आलेले असले तरी त्यातील चार जण मात्र या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. दरम्यान, नौदलाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश जारी केले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय नौदलाला सामोरे जाव्या लागलेल्या घटनांची संख्या आता चार झाली असून त्यात आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीला स्फोटानंतर मिळालेल्या जलसमाधीच्या मोठय़ा दुर्घटनेचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस तलवारने दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की, मासेमारी ट्रॉलरला धडक मिळालेल्या जागीच जलसमाधी मिळाली. या दुर्दैवी धडकेनंतर लगेचच आयएनएस तलवारवरील अधिकाऱ्यांनी मदत कार्य हाती घेतले आणि ट्रॉलरवरील सर्वाचे प्राण वाचविले. त्यांच्यापैकी चार जखमींवर वैद्यकीय उपचारही करून सर्वानाच किनारपट्टीवर आणण्यात आले.  
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस या मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नव्हती, त्यामुळेच त्यांचे अस्तित्व लक्षात आले नाही, अशी भूमिका आयएनएस तलवारवरील संबंधित अधिकाऱ्यांतर्फे घेण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी नौदलातर्फे या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले.
या सरत्या वर्षांमध्ये भारतीय नौदलाला एकूणच चार दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्यातील स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस स्फोटांनंतर जलसमाधी मिळालेली आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीची घटना सर्वाधिक दुर्दैवी होती. त्या दुर्घटनेत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
याशिवाय अलीकडेच ४ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे आयएनएस कोकण ही युद्धनौका सुक्या गोदीत असताना तिच्यावर अचानक आग लागली. महत्त्वाचे म्हणजे नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी त्या घटनेच्या आदल्या दिवशीच सारे काही आलबेल असल्याची ग्वाही पत्रकार परिषदेत दिली होती.
मध्यंतरी ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौकेवरही आग लागण्याची घटना उघडकीस आली होती.