भाजपशी युती करून शिवसेनेने औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सलग सहाव्यांदा सत्तेचा गड राखला असला तरी बंडखोरीचे ग्रहण लागल्याने तेथे सत्तेसाठी बंडखोरांचाच टेकू घ्यावा लागणार आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांनी आपले अस्तित्व राखून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या असल्या तरी तेथेही पाच अपक्षांच्या आधारावर सत्तेचा गड सर करावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्य़ात भाजपचा स्वबळाचा दावा फुसका ठरवत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकेत शिवसेनेने निसटते का होईना बहुमताचे top01शिखर गाठले आहे.
सत्तेत आल्यावर झालेल्या पहिल्याच मोठय़ा निवडणुकीत यश मिळविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान होते. युती झाली तिथे यश मिळाले असले तरी स्वबळावर लढताना भाजप सेनेसमोर दुय्यम ठरल्याने मुख्यमंत्र्यांना हा धक्काच आहे.
नवी मुंबईत १११ नगरसेवकांच्या सभागृहात राष्ट्रवादी ५२, काँग्रेस १०, शिवसेना ३८, भाजप ६, आणि अपक्ष ५ असे संख्याबळ राहणार आहे. नवी मुंबईत युती झाली तरी सेना-भाजपमध्ये बंडखोरीही उफाळून आली. त्याचा फटका युतीला बसला.
अंबरनाथमध्ये ५७ पैकी २५ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. एक शिवसेना पुरस्कृत उमेदवार तर दोन ठिकाणी सेना बंडखोर विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ २८ झाले असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अवघ्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत सेनेपुढे मोठे आव्हान उभे करणाऱ्या भाजपला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्वत्र वाताहत सुरू असलेल्या काँग्रेसने मात्र यंदा स्वबळावर लढून आठ जागा जिंकल्या, राष्ट्रवादीलाही अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले, तर गेल्या निवडणुकीत सहा जागा जिंकणाऱ्या मनसेला यंदा अवघ्या दोन जागा मिळाल्या. सहा अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला काठावरचे का होईना बहुमत मिळाले असून पालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेना सत्तेत येणार आहे. शिवसेनेला २४ तर भाजपला २० जागा मिळाल्या आहेत.  राष्ट्रवादीला दोन तर एक अपक्ष निवडून आला आहे. काँग्रेसला बदलापूरमध्ये एकही जागा मिळालेली नाही.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत धार्मिक आधारावर मोठय़ा प्रमाणावर मतांचे ध्रुवीकरण झाले. या निवडणुकीत ‘एमआयएम’ने २६ जागा पटकावत मारलेली मुसंडी लक्षणीय ठरली असून काँग्रेससाठी ही इशारा घंटाच आहे. काँग्रेसचा राज्यात इतरत्र साफ धुव्वा उडाला असताना भोकरमध्ये बहुमत मिळवून माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाची लाज राखली.
शिवसेनाच मोठा भाऊ
पालिका निवडणुकांच्या निकालावर युतीचा वरचष्मा असला तरी विधानसभेच्या विजयापासून हवेत असलेल्या भाजपची शहरी भागातच पीछेहाट झाल्याचे निदर्शनास येत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत गमावलेले मोठय़ा भावाचे स्थान या निवडणुकांनी शिवसेनेला मिळवून दिल्याने, मुंबई-ठाणे महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा वरचष्मा राखण्याची शिवसेनेची उमेद वाढली आहे.

अंबरनाथमध्ये सेनेची सत्ता
अंबरनाथमध्ये ५७ पैकी २५ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. एक शिवसेना पुरस्कृत तर दोन सेना बंडखोर विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ २८ झाले असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अवघ्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.
बदलापुरात स्वबळावर.. शिवसेनाच!
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत काठावरचे बहुमत मिळून का होईना, पण पहिल्यांदाच शिवसेना स्वबळावर सत्तेत येणार आहे. शिवसेनेला २४ तर भाजपला २० जागा मिळाल्या आहेत.