मुंबई : नवी मुंबईतील गृहखरेदी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणातील आरोपी आणि मोनार्क युनिव्हर्सल समूहाचे गोपाळ अमरलाल ठाकूर यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने ठाकूर यांना गुणवत्तेच्या आधारे जामीन मंजूर केलेला नाही. तर सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) त्यांच्याविरोधात अद्याप खटला सुरू करता आलेला नाही. परिणामी, ठाकूर यांना खटल्याविना दीर्घकाळापासून कारागृहात राहावे लागत असल्याने त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
ठाकूर यांना १ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती आणि आत्तापर्यंत ते तीन वर्षे, एक महिना आणि सात दिवस कारागृहात बंदिस्त आहेत. याचाच अर्थ ठाकूर हे दोषी ठरल्यास होणाऱ्या शिक्षेच्या अर्ध्याहून अधिक काळ कारागृहात बंदिस्त आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्याविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होऊन निकाली निघण्याची शक्यताही नाही. त्यामुळे, ठाकूर हे दीर्घकाळापासून कारागृहात असल्याच्या कारणास्तव जामीन मिळण्यास पात्र असल्याचे न्यायमूर्ती पितळे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. तसेच, ठाकूर यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, ठाकूर यांच्यावर या व्यतिरिक्त सहा गुन्हे दाखल असून त्या सगळ्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. याउलट, या प्रकरणात त्यांच्यावर अद्याप आरोपनिश्चितीची प्रक्रियाही झालेली नाही. शिवाय, प्रकरणात ६७ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्याचा ईडीचा मानस असून खटला निकाली निघण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे, असे ठाकूर यांच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी युक्तिवादाच्या वेळी न्यायालयाला सांगितले.
हेही वाचा – नाशिक, अहमदाबाद महामार्गांवर अवजड वाहतुकीस निर्बंध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
ठाकूर हे त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांतच दोषी ठरले तरी त्यांनी कमाल सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, परंतु, या तुरुंगवासाच्या निम्म्याहून अधिक काळ ठाकूर हे कारावास भोगत आहेत. या सगळ्या बाबींच्या आधारे ठाकूर यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी चव्हाण यांनी न्यायालयाकडे केली होती.
दुसरीकडे, ईडीने ठाकूर यांना जामीन देण्यास विरोध केला. तर, ठाकूर यांच्या गृहप्रकल्पात नोंदणी केलेल्या आणि आगाऊ रक्कम भरलेल्या गृहखरेदीदारांच्या वतीने त्यांच्या या घोटाळ्यामुळे झालेल्या दुरावस्थेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, ठाकूर यांना जामीन देण्यास विरोध केला. न्यायालयाने मात्र ठाकूर यांच्या वतीने केलेला युक्तिवाद योग्य ठरवला व त्यांना जामीन मंजूर केला.
बांधकाम व्यावसायिक ठाकूर यांनी गृहखरेदीदारांकडून जमा केलेली रक्कम त्यांच्या मालकीच्या अन्य कंपन्यांकडे वळवली. तसेच, ठाकूर यांनी एकाच घराची अनेक खरेदीदारांना विक्री केल्याचे आणि आधीच विक्री झालेली घरे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचे तपासादरम्यान उघड झाल्याचा ईडीचा दावा आहे.