प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दांपत्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावेळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या याचिकेवर २.३० वाजता सुनावणी होणार आहे.

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राणा दांपत्याविरोधात कलम १५३ अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रविवारी स्पष्ट झालं. त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही गुन्हा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती घरत यांनी केली. राणांच्या वतीने त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पोलिसांच्या कोठडीला विरोध करताना त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या वेळी न्यायालयाने तपास अधिकारी आणि वकिलांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. करोना चाचणीनंतर नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात आलं.

आणखी एक गुन्हा

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी राणा दाम्पत्याने अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यातही पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत राणा दाम्पत्यावर पोलिसांनी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली.

सोमय्याप्रकरणी गुन्हा

राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यात सोमय्या जखमी झाले होते. त्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरणातील कलमांबाबत सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. सोमय्या यांच्या चालकाविरोधातही भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात आलेल्या सोमय्या याच्या चालकाने भरधाव गाडी चालवून दोघांना किरकोळ जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

१६ शिवसैनिकांना अटक व सुटका

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी करून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही शिवसैनिकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत १६ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. मात्र, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana and ravi rana approach the bombay high court for cancellation of fir in hanuman chalisa row sgy