खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी “मी अशी काय चूक केली की त्याची शिक्षा देण्यात आली,” असा सवाल ठाकरे सरकारला केला. तसेच १४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार असल्याचं मत व्यक्त केलं. त्या लीलावती रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा म्हणाल्या, “माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे.”

“मी ही लढाई पुढेही लढत राहील”

“तुरुंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसात ही महिला दबली जाणार नाही. आमची लढाई देवाच्या नावाची आहे. मी ही लढाई पुढेही लढत राहील,” असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

“आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला”

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “क्रुरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणं गरजेचं असल्याचं लिहून दिलं तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझं मानसिक शोषण झालं. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी आहेत.”

हेही वाचा : “आम्ही तुरुंगात असताना बीएमसीकडून नोटीस, मात्र १५ वर्षांपूर्वी…”, रवी राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेतून निवडून येऊन दाखवा”

“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल. रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचं उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरेल. राम आणि हनुमानाच्या नावाला विरोध करणाऱ्यांसोबत काय होतं हे त्यांना निवडणुकीत जनता दाखवून देईल,” असंही राणा यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana first reaction on thackeray government after discharge from lilavati hospital mumbai pbs