मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारानंतर नवनीत राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे त्यांची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर मातोश्री आणि शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा २० फूट जमिनीखाली गाडण्यात येईल. शिवसेनेला अंगावर घेण्याऱ्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावे, अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यासह भाजपाला इशारा दिला होता.

ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत २० फूट खोल खड्ड्यामध्ये गाडू असेल म्हटले होते. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनता त्यांना खड्ड्यात टाकणार आहे यात काही दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी दिल्लीला जाणार आहे आणि त्यांच्याविरोधात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढण्याचे आव्हान

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरणार – नवनीत राणा

“मुंबई महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी जनतेमध्ये जाईन. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा आणि रामाचं नाव घेणाऱ्यांना त्रास दिल्यानंतर काय परिणाम होतात हे दाखवून देईल,” असंही राणा म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana informed lodge a complaint with pm modi against sanjay raut abn