|| निलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रीचा हंगाम रित्या हाती, उपासमारीची वेळ

मुंबई : लगीनसराई, कुळदेवतेचे कुळाचार यांमध्ये जागरण- गोंधळ करून उपजीविका करणाऱ्या गोंधळी कलावंतांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. किमान नवरात्रीत तरी कार्यक्रम करून पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा त्यांना होती; परंतु सरकारी नियमावलीनुसार अशा कार्यक्रमांना परवानगी नसल्याने हाही हंगाम रित्या हाती बसून काढावा लागणार, अशी खंत या कलावंतांनी व्यक्त केली आहे.

गेले आठ महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांची उपासमार होत आहे. त्यातही धार्मिक विधींवर पोट भरणारे हजारो गोंधळी कलावंत आज आर्थिक चणचण सोसत आहेत. काहींनी वेठबिगारीची वाट धरली तर काही शिक्षणाअभावी जागरण- गोंधळाच्या कार्यक्रमाला परवानगी मिळण्याची वाट पाहत आहेत. ‘नवरात्रीत केवळ गोंधळ नसतो तर देवीचे धार्मिक विधी, आरती, धार्मिक गाण्यांचे कार्यक्रम दिवसरात्र सुरू असतात. शिवाय नवरात्रीत केवळ पैसे नाही तर अन्नधान्याचा शिधाही दिला जातो. ज्यावर पुढचे काही महिने गोंधळी आपली उपजीविका करतो. यंदा जागरण- गोंधळासाठी एकाही मंडळाकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर करोनाच्या भीतीने घरगुती कार्यक्रमही रद्द झाले,’ असे धारावीतील गोंधळी मंगेश भोरे यांनी सांगितले.

ज्येष्ठ लोककलावंत छगन चौगुले यांचे करोनाने निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा सुनील चौगुलेही याच परिस्थितीला तोंड देत आहे. ‘मार्च ते जूनपर्यंत आमचा लग्नांचा हंगाम असतो. तो पूर्णत: बुडाला. मंदिरे बंद असल्याने कुळाचाराचे विधीही गेले. ज्या नवरात्रीत आम्ही दिवसरात्र एक करून भविष्याची तरतूद करतो, ती नवरात्रही कामावाचून जाणार असल्याने आता खायचे काय,’ असा प्रश्न चौगुले यांनी उपस्थित केला आहे. काही कलावंतांकडे मुलांचे शिक्षण, घरभाडे यासाठी पैसे नाहीत, कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने सशर्त का होईना परवानगी द्यावी, असे ते म्हणाले.

मुंबईत धारावी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड, वाशी, मानखुर्द, विरार इथल्या वस्त्यांमध्ये आजही बरेच गोंधळी आहेत. त्यापैकी काही जण गोंधळासोबत जोडधंदा किंवा मोलमजुरी करून आपली उपजीविका करत आहेत, तर काही मात्र अन्नान्नदशेत आहेत. हीच अवस्था राज्यभरातील गोंधळी, भराडी, आराधी या धार्मिक विधींवर पोट भरणाऱ्या कलावंतांची आहे, अशी माहिती काही कलावंतानी दिली.

माझ्या पार्टीत दोन स्त्रिया आणि सहा पुरुष असे आठ कलाकार काम करतात. गोंधळाचे कार्यक्रम थांबल्याने हे सर्व कलाकार बेरोजगार झाले. आठ महिन्यांत केवळ दोन कार्यक्रम मिळाले, तेही घरगुती. तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करत असतो. पण तीही मिळकत बंद झाले

– दत्ता साळुंखे, शिवशंभो मल्हार गोंधळी पार्टी, कुर्ला