मुंबईतील रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोस्टल रोड आणि नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील विघ्न दूर झाले आहे. कोस्टल रोडला नौदलाने परवानगी दिली असून, नवी मुंबई विमानतळाविरोधात दाखल झालेली याचिकाही मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
मुंबई महापालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नरीमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान ३४ किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येणार असून, यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एक ऑक्टोबरला उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेने किनारा रस्ता प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू केले होते. यासाठी पर्यावरण मंत्रालय आणि अन्य विभागांकडे अर्ज करण्यात आले होते. कोस्टल रोडसाठी नौदलाने हिरवा कंदील दिला आहे. नौदलाने ना हरकत प्रमाणपत्र देतानाच कोस्टल रोडला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तसेच पोलीस ठाणे तयार करण्याची अट घातली आहे.
नौदलाने या मार्गासाठी हिरवा कंदील दर्शवला असला तरी पर्यावरण विभागाच्या अटीचा तिढा कायम आहे. या रस्त्यामुळे खारफुटीचे प्रचंड नुकसान होणार असून, नष्ट होणाऱ्या खारफुटीच्या पाचपट लागवड करण्याची अट पालिकेवर घालण्यात आली. तसेच या रस्त्याला जोडणारी ट्रामसेवा सुरू करावी आणि रस्त्याच्या बाजूला सायकल ट्रॅक ठेवून सायकलीने जाणाऱ्यांनाही सुविधा द्यावी, असेही पर्यावरण विभागाने म्हटले होते. या अटी महापालिकेला अमान्य असल्याने तिढा निर्माण झाला आहे.
दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाविरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तुम्हाला उशीरा जाग का आली, असा सवालच न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. तर या विमानतळामुळे नैसर्गिक संपत्तीला बाधा पोहोचणार नाही, असे सिडकोने न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा