भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात १,००० कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानाचा खटला दाखला केलाय. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील आता नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्याला मलिकांनी प्रत्युत्तर देत दरेकरांना आव्हान दिलंय. सोमवारी (२९ नोव्हेंबर) या प्रकरणातच मलिकांना माझगाव कोर्टात हजर राहावं लागलं. तिथं त्यांना जामीन देण्यात आला.
नवाब मलिक यांनी प्रविण दरेकर यांचं एक ट्वीट रिट्वीट करत म्हटलं, “आ देखें जरा किसमें कितना है दम”.
प्रविण दरेकर काय म्हणाले होते?
प्रविण दरेकर म्हणाले होते, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला फारशी किंमत दिली जात नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात फारसा बेस नाही. काँग्रेसबद्द्ल विदर्भातील लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून विदर्भात अधिवेशन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात १ हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.”
जामिनानंतर नवाब मलिक काय म्हणाले होते?
नवाब मलिक म्हणाले, “न्यायालयात आमच्या आणि त्यांच्या वकिलांकडून काही गोष्टी मांडण्यात आल्या. कोर्टाने विचारलं तुमच्यावरील अब्रुनुकसानीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? मी हे आरोप अजिबात मान्य नसल्याचं सांगितलं. मी हे आरोप मान्य करायला अजिबात तयार नाही. मी जे काही सांगितलंय त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते सर्व पुरावे आम्ही कोर्टासमोर ठेऊ. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे.”
“आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरणही न्यायालयासमोर ठेवलं आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हेही वाचा : “नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल, म्हणूनच…”, प्रविण दरेकरांनी साधला निशाणा!
“मला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. मी तसा बाँड दिला आहे. यापुढे जेव्हा न्यायालयात तारीख असेल तेव्हा आम्ही न्यायालयात हजर होऊ,” असंही मलिकांनी नमूद केलं.
गर्दी जमवून न्यायालयावर दबाव आणल्याच्या आरोपावर मलिकांचं प्रत्युत्तर
नवाब मलिकांवर गर्दी जमवून न्यायालयावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आम्ही गर्दी जमा केलेली नाही. माझ्यासोबत माझे सरकारी सुरक्षारक्षक आहेत.”