महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीनं अटक केली. त्यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत देखील पाठवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. नवाब मलिकांच्या घरी आणि ईडी कार्यालयात काल दिवसभर नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. बुधवारी भल्या सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं, याविषयी आता त्यांच्या मुलीनेच खुलासा केला आहे.
‘त्या’ ८ तासांत नेमकं काय घडलं?
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी ईडीनं धाड टाकली. त्यांच्या घरात झडती घेतल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणण्यात आलं आणि तिथेच दुपारी ३ च्या सुमारास ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पण या ८ तासांमध्ये नेमकं काय घडलं? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भात खुलासा केला आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ६ वाजताच घरी आल्याचं त्या म्हणाल्या.
“आई नमाजसाठी उठली, तेवढयात बेल वाजली”
“सकाळी ६ वाजता आम्ही नमाजसाठी उठतो. माझी आई त्यासाठी उठली होती. तेवढ्यात बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ईडीचे अधिकारी दिसले. आईने जाऊन बाबांना सांगितलं की ईडीचे अधिकारी आले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला घर सर्च करायचं आहे. आम्ही म्हटलं करा सर्च. सर्च केल्यानंतर ते बाबांना म्हणाले तुम्हाला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी यावं लागेल. तर बाबा म्हणाले ठीक आहे, तुम्ही थांबा थोडा वेळ. मग त्यांनी चहा-पाणी घेतलं. नाश्ता करून ते स्वत:च्या गाडीत ईडीच्या कार्यालयात गेले”, असं निलोफर खान म्हणाल्या आहेत.
“माझे भाऊ वकील आहेत. ते बाबांना ईडीच्या कार्यालयापर्यंत घेऊन गेले. पण तिथे जेव्हा ते पोहोचले, तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी बाबांना समन्स दिलं. बाबा म्हणाले मी सही करणार नाही. कारण तुम्ही समन्स आधी द्यायला हवा होता. तुम्ही मला माझ्याच गाडीत बसवून इथे आणलं. आता तुम्ही आम्हाला समन्स देत आहात. हा कुठला प्रोटोकॉल आहे? ही जबरदस्तीच आहे”, असं देखील निलोफर खान म्हणाल्या.
“बाबा म्हणाले, समन्स आलेलं नाही”
दरम्यान, या सगळ्या घडामोडींविषयी समजल्यानंतर नवाब मलिकांना निलोफर खान यांनी फोन करून विचारणा केली असता गाडीत असतानाच त्यांनी समन्स न आल्याचं सांगितलं, असं त्या म्हणाल्या. “सुदैवाने माझ्या आत्या आमच्या घराजवळच राहतात. त्यांनी मला फोन केला की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी आईला फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं काहीच अडचण नाही, तुझे वडील ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. मी बाबांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले मी ईडीच्या कार्यालयात जातोय. समन्स आलेले नाहीत, फक्त प्रश्न-उत्तरांसाठी जातोय”, असं निलोफर खान म्हणाल्या.
“आम्हाला रिमांड कॉपी मिळाली. त्यात म्हटलंय की नवाब मलिक महसूल मंत्री असताना हा जमीन खरेदी घोटाळा झाला आहे. ते म्हणतात नवाब मलिक महसूल मंत्री होते, पण ते कधीच महसूल मंत्री नव्हते. ५५ लाखांचा व्यवहार झाला होता, पण तो ३०० कोटींचा बनवला. आम्हाला ज्या प्रकारे भाजपाकडून त्रास दिलाय जातोय. मला आनंद आहे की महाविकास आघाडी पाठिंबा देत आहे”, असं देखील निलोफर खान म्हणाल्या.