आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली़. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मुंबई भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी आनंद साजरा केला. कंबोज यांनी आपल्या समर्थकांसोबत स्वत:च्या घराबाहेर फटाके फोडून मलिक यांना अटक झाल्याबद्दल सेलिब्रेशन केलं. मात्र या सेलिब्रेशनमधील एक चूक त्यांना महागात पडली असून त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली.
नक्की वाचा >> “नवाब मलिक डान्सबार चालवायचे, बांगलादेशमधून मुली आणून त्यांना वेश्या…”; पुरावे असल्याचं सांगत भाजपा नेत्याचा आरोप
मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर मोहित कंबोज यांनी आपल्या समर्थकांसहीत घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा समर्थकांनी पक्षाचे झेंडे फडकवत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. यावेळी मोहित कंबोज यांनी म्यानातून तलवार काढून ती हवेत उचावत जल्लोष साजरा केला. मात्र उत्साहाच्या भरात केलेल्या या कृतीमुळे आता कंबोज अडचणीत आले आहेत.
नक्की वाचा >> ३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?
कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंबोज यांनी केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस स्थानकामध्ये कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. करोना नियमांचं उल्लंघन करुन गर्दी जमल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार नाचवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान आज सकाळी कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे असा दावा केलाय.