२ ऑक्टोबरला मुंबईत एनसीबीनं कार्टेलिया क्रूजवर केलेल्या कारकवाईनंतर नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी आणि समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं आहे. ही सर्व कारवाई बनाव असून समीर वानखेडेंनी सेलिब्रिटींकडून दुबई-मालदीवमध्ये जाऊन वसुली केल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूने समीर वानखेडेंनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला राजस्थानमधून धमकी देणारा फोन आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून याबाबत नवाब मलिक यांनी तक्रार दाखल केल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती देताना हा कॉल राजस्थानमधून आल्याचं सांगितलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका आणि आरोप न करण्याविषयी कॉलमध्ये आपल्याला सांगण्यात आल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं केलेल्या कारवाईवर नवाब मलिक सातत्याने आक्षेप घेत आहेत. करोना काळात सर्व सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय नेमक्या त्याच काळात मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते? असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. काही लोकांना चुकीच्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांच्याकडून वसूली करण्याचा प्रयत्न मालदीव आणि दुबईत झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी माझ्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलं आहे.
“नवाब मलिक चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्टी घालवण्यासाठी गेलो होतो. यासाठी मी विभागाची रीतसर परवानगी देखील घेतली होती. तिथे मी कुणालाही भेटलो नाही. अशा प्रकारच्या आरोपांना मला अजून काहीही उत्तर द्यायचं नाही. डिसेंबरमध्ये मी मुंबईत होतो. पण त्यांचा आरोप आहे की मी दुबईला होतो. याची चौकशी देखील ते करू शकतात”, असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.