राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार अचानक दिल्लीला का गेले यावर उत्तर दिलंय. तसेच या दिल्ली दौऱ्यानंतर सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या फोटोवरही भाष्य केलंय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपाचं सरकार येणार या नारायण राणे यांच्या राजकीय भविष्यवाणीचाही समाचार घेतला.
नवाब मलिक म्हणाले, “काल शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल संसदीय समितीच्या सुरक्षा विषयावर बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. चीनने सीमेवर गाव वसवण्याचा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळेच दोन्ही नेते दिल्लीत होते. अशातच नारायण राणेंनी मार्चमध्ये सरकार बनवू असं वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर एक मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. या फोटोत अमित शाहांसमोर शरद पवार ज्या पद्धतीने बसल्याचं दाखवलं दे अपमानास्पद आहे. हा फोटो मॉर्फ होता.”
” देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनंतर नारायण राणेही स्वप्न पाहत आहेत”
“भाजपाच्या आयटी सेलचा फर्जीवाडा देशात जास्त दिवस चालणार नाही. आम्ही शरद पवार यांचा खरा फोटोही समोर आणला आहे. त्यांचा फर्जीवाडा समोर आणला. हे सरकार ५ वर्षे पूर्ण करेन, लोकांनी वारंवार भविष्यवाणी करत राहावी. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील स्वप्न पाहून उठत राहिलेत. आता नारायण राणे तेच करत आहेत. त्यांचं १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपद गेलं. पुन्हा हे पद मिळावं म्हणून ते आधी काँग्रेसमध्ये गेले आणि मग भाजपात गेले,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
“मागील २३ वर्षात अनेक बकरे आणि कोंबडे जमा झाल्यानं राणे बोलत आहेत”
“नारायण राणे सिंधुदुर्गचे आहेत. तेथे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोंबडा बकरे बळी देण्याचा नवसही केला जातो. मागील २३ वर्षात इतके बकरे आणि कोंबडे जमा झालेत की ते पाहून लाजेखातर त्यांना काहीतरी बोलावं असं वाटत असावं,” असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.
“केंद्रीय अधिकारी माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत”
नवाब मलिक म्हणाले, “अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
“केंद्रीय यंत्रणा राज्यात एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव रचत आहे”
“केंद्रीय यंत्रणा राज्यात एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते खरे पुरावे आहेत. अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप चॅटही मला मिळाल्यात. मी अमित शाह यांनाही तक्रार करणार आहे. त्यांचे अधिकारी असं काम करत असतील तर ते काय कारवाई करतात हे आम्ही बघू,” असंही मलिकांनी नमूद केलं.
मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल
दरम्यान, शरद पवार अचानक सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीत दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले होते. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”
नारायण राणे म्हणाले होते, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”
“नारायण राणे काय बोलतात याकडे लक्ष देत नाही”
नारायण राणे यांच्या या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला लगावला.