महाराष्ट्राला लसीचा जेवढा पुरवठा आवश्यक आहे, तेवढा पुरवठा केंद्रसरकारकडून होत नाही. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांची २० लाख संख्या असून पहिला डोस घेणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल परंतु पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये लसीचा साठा असून तो संपत नाहीये. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती आहे. त्यामुळे त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून राज्यात निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. खासगी रुग्णालयांना त्यांच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल, असेही मलिक म्हणाले. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रसरकारने राज्यात निर्माण झालेली लस टंचाई लक्षात घेता तात्काळ लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी केल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.