राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज (३ नोव्हेंबर) नवं ट्वीट करत सूचक इशारा दिलाय. त्यामुळे आता मलिक यांच्याकडून कुणावर हल्लाबोल होणार, कुणाला लक्ष्य केलं जाणार याकडे अनेकांच्या नजरा आहेत. याआधी नवाब मलिक यांनी अशाच प्रकारे आधी ट्वीट करत इशारा देऊन नंतर आणखी काही ट्विट्स किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोपांची राळ उठवून दिली होती. त्यामुळे आज ते कुणावर काय आरोप करतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उलाढालींचे मास्टर माइंड; नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

मलिक यांच्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस

नवाब मलिक यांनी हे ट्वीट केल्यानंतर काही वेळातच यावर प्रतिक्रियांचा पाऊस आलाय. तसेच अनेकजण हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट देखील करत आहे. या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जशा नवाब मलिक यांच्या कौतिकाच्या प्रतिक्रिया आहेत तशाच त्यांच्यावर टीका करणाऱ्या देखील आहेत.

नवाब मलिक यांच्याकडून अनेकांचा पर्दाफाश करण्याचा इशारा

दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. यात त्यांनी प्रतिक गाबापासून अनेकांचा उल्लेख केलाय. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात सदनाच्या पटलावर या सर्वांवरील आरोपांबाबतचे पुरावे ठेवणार असल्याचं म्हटलंय.

“सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण प्रकरणाचा वसुलीसाठी वापर”

“समीर वानखेडे मुंबई एनसीबीत आल्यानंतर त्यांनी १५/२०२० हा गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी यात आरोपपत्रही दाखल नाही. मागील १४ महिने या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आलेत,” असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडे आल्यानंतर एनसीबीने एक गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली खानला हजर करण्यात आलं, त्याच प्रकरणात श्रद्ध कपूरला बोलावण्यात आलं, त्याच प्रकरणात दीपिका पदुकोनला बोलावण्यात आलं. संपूर्ण बॉलिवूडला या प्रकरणात बोलावण्यात आलं, आजपर्यंत ना ते प्रकरण संपलं, ना आरोपपत्र. असं काय आहे की १४ महिने हे प्रकरण बंदच होत नाहीये.”

“दीपिका, सारा, श्रद्धा प्रकरणात हजारो कोटी रुपयांची वसुली”

“या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आले. ही वसुली मालदीवला झालीय. आम्ही २ फोटो दाखवले, एक दुबईचा आणि एक मालदीवचा. हे म्हणतात मी कधीच दुबईला गेलो नव्हतो, पण त्यांची बहिण दुबईला गेली होती. ते स्वतः मालदीवमध्ये होते. मालदीवचा दौरा सोपा नसतो. एवढे लोक गेले तर २०-३० लाख रुपयांचा खर्च येतो. याचा तपास झाला पाहिजे. यांचा खर्च कोणत्या खात्यातून झाला हे एनसीबीच्या सतर्कता विभागानं शोधावं,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

“पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५० लाखाचे आणि…”

नवाब मलिक म्हणाले, “कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं.”

“समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसुली केली”

“मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. कोणता अधिकारी एवढ्या महागाचे कपडे घालतो? एकदा घातलेले कपडे पुन्हा घालत नाही. दररोज २ लाखांचे बुट घालतो इतका प्रामाणिक अधिकारी असू शकत नाही. समीर वानखेडेने हजारो कोटी रुपयांची वसुली केलीय यावर मी ठाम आहे,” असे आरोप नवाब मलिकांनी केले.