राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्वीट करत मोठा दावा केलाय. उद्या (११ डिसेंबर) माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत असं म्हणत मलिकांनी ईडी छाप्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आम्ही न घाबरता पाहुण्याचं स्वागत करू असंही त्यांनी म्हटलं. या ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी “गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से” असं म्हणत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
नवाब मलिक म्हणाले, “मी ऐकलंय की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. घाबरणं म्हणजे दररोजचं मरणं आहे. आम्हाला घाबरायचं नाही, तर लढायचं आहे. गांधी गोऱ्यांसोबत लढले, आम्ही चोरांसोबत लढू.”
आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये मलिकांनी कोर्टाच्या अवमानप्रकरणी समीर वानखेडे यांच्याव वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर भाष्य केलंय. त्यांनी लाईव्ह लॉ या कायदेविषय संकेतस्थळाचं ट्वीट रिट्विट केलं. यात नवाब मलिक यांनी न्यायालयात काय म्हटलं हे सांगण्यात आलं. यानुसार, नवाब मलिक म्हणाले, “मला वाटतं माझं वक्तव्य मला केंद्रीय संस्थाचा राजकीय उद्देशाने होत असलेल्या वापरावर आणि आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडताना अधिकाऱ्यांच्या वर्तनावर भाष्य करण्यापासून रोखत नाही.”
हेही वाचा : समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा ‘तो’ निकालच वाचून दाखवला
दरम्यान, नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यातील अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही आपल्या कुटुंबीयांवरील आरोपांचे सत्र सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.