राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केलाय. मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत, असा आरोप मलिकांनी केला. तसेच या संशयितांचे फोटोही ट्वीट केलेत. यावेळी नवाब मलिकांनी या फोटोतील लोकांना कुणी ओळखत असेल तर माहिती देण्याचंही आवाहन केलंय.

नवाब मलिक म्हणाले, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”

हेही वाचा : “झेड प्लस सुरक्षाही कंगनाला वाचवू शकणार नाही”, नवाब मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून साधला निशाणा!

नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या फोटोत काय दिसतंय?

नवाब मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले आहेत. यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत आहे. तसेच त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे.

नवाब मलिक यांनी या ५ फोटोंमध्ये एक फोटो गाडीचाही ट्वीट केलाय. त्यात गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. मात्र, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader